नाशिक जिल्ह्यातील राहुड घाटात एलपीजी गॅस टँकर उलटल्याने गॅस गळती, वाहतूक वळविली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 11:17 IST2025-09-09T11:15:51+5:302025-09-09T11:17:28+5:30
नाशिक धुळे महामार्गावर सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास भारत पेट्रोलियम कंपनीचा एलपीजी गॅस टँकर उलटला.

नाशिक जिल्ह्यातील राहुड घाटात एलपीजी गॅस टँकर उलटल्याने गॅस गळती, वाहतूक वळविली
नाशिक धुळे महामार्गावर सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास भारत पेट्रोलियम कंपनीचा एलपीजी गॅस टँकर उलटल्याने मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू असून त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूची वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली आहे. आज सोमवारी सकाळपासून अपघातग्रस्त टँकर मधील गॅस अन्य टँकर मध्ये शिफ्ट करण्याचे काम सुरू होते. टँकर चालकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोलीस प्रशासनामार्फत खबरदारीची बाब म्हणून नासिक-धुळे महामार्ग चांदवड येथे बंद करण्यात आला असून नाशिक कडून धुळ्याकडे जाणारी वाहतूक चांदवड-मनमाड मार्गे मालेगाव-धुळे अशी वळविण्यात आली आहे व धुळे कडून नाशिक कडे जाणारी वाहतूक मालेगाव- देवळा-सोग्रस फाटा-नाशिक अशी वळविण्यात आली आहे. सदरच्या टँकरचे गॅस गळतीचे काम जोखमीचे असल्याने त्या कामास संपूर्ण दिवस लागू शकतो अशी माहिती चांदवड पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आलेली आहे. खबरदारी म्हणून आसपासचा परिसर रिकामा करण्यात आला असून प्रशासन परिस्थिती वर लक्ष ठेवून आहे.