दारू आणि जुगारबंदीचा महिला ग्रामसभेत एकमुखी निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 17:52 IST2018-09-17T17:51:25+5:302018-09-17T17:52:22+5:30
सिन्नर तालुक्यातील जामगाव येथील महिलांनी एकत्र येऊन दारू आणि जुगारबंदी करण्याचा एकमुखी निर्णय महिला ग्रामसभेत घेतला. तसेच पर्यावरणास घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर टाळून गावात प्लॅस्टिकबंदीचा ठरावही यावेळी करण्यात आला.

दारू आणि जुगारबंदीचा महिला ग्रामसभेत एकमुखी निर्णय
सिन्नर : तालुक्यातील जामगाव येथील महिलांनी एकत्र येऊन दारू आणि जुगारबंदी करण्याचा एकमुखी निर्णय महिला ग्रामसभेत घेतला. तसेच पर्यावरणास घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर टाळून गावात प्लॅस्टिकबंदीचा ठरावही यावेळी करण्यात आला.
सरपंच सुनीता घेगडमल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महिला ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच गावास निर्णायक ठरणारे निर्णय घेण्यात आले. उपसरपंच मुकुंद बोडके, ग्रामसेवक जयवंत साखरे, ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत ही ग्रामसभा घेण्यात आली. गावात व परिसरात अनधिकृतपणे दारू विक्र ी करणाºयांची संख्या मोठी असून, त्याविरोधात महिलांनी रणशिंग फुंकले आहे. गावातील तरुणांचे आयुष्य दारू आणि जुगाराने उद्ध्वस्त होत असल्याने अनेकांचे संसार देशोधडीला लागल्याने आक्रमक झालेल्या महिलांनी हा निर्णय घेतला. त्यानंतर महिलांनी ग्रामसभा घेऊन दारू व जुगारबंदी करण्याचा ठराव मांडला. त्यास सर्वांनी पाठिंबा दर्शविला. ग्रामसभेत कुपोषण निर्मूलन, महिला-बाल कल्याण, स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ याविषयी ग्रामस्थांना माहिती देण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दशरथ बोडके, शिवाजी साबळे, रूपाली बोडके, अनिता खोकले, ताईबाई बोडके, पोलीसपाटील शंकर कातकडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नारायण बोडके आदींसह गावातील महिला उपस्थित होत्या.
प्लॅस्टिकबंदीचाही निर्णय
पर्यावरणास हानिकारक ठरणाºया प्लॅस्टिकच्या वापराने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गावात कुणीही प्लॅस्टिक पिशव्या वापरणार नाही. त्याऐवजी कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करून नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा, असे आवाहन यावेळी ग्रामसेवक जयवंत साखरे यांनी केले. सर्व ग्रामस्थांनी त्यास संमती देत या निर्णायाची आदर्श अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली.