नाशिक : अनैतिक संबंधांच्या संशयातून तसेच वडील आपल्यापेक्षा इतर भावांना अधिक पैसे देत असल्याच्या कारणातून वडिलांच्या डोक्यात पाटा टाकून त्यांची हत्या करणाऱ्या सिद्धार्थ भगवान ऐडके याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखेच्या अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, उपनगर पोलीस ठाणेच्या हद्दीत २८ मार्च २०१९ रोजी सिध्दार्थ भगवान ऐडके ( गौतमनगर, नाशिकरोड) याला त्याचे पत्नी व वडील यांचे अनैतिक संबंध असल्याच्या संशय होता. वडील मोटारसायकल घेण्यासाठी पैसे देत नाही व दुसऱ्या भावांना जास्त पैसे देतात या कारणावरून त्याने त्याचे वडील
भगवान नामदेव ऐडके यांचे डोक्यात दगडी पाटा टाकून खून केला होता. याप्रकरणी त्याच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी सबळ पुरावे गोळा करून, आरोपीविरूध्द जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात गुरुवारी (दि. २६) जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक १चे न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी आरोपीविरुध्द् फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या
परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीला खुनाच्या प्रकरणात जन्मठेप व दोन हजार रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता सुलभा सांगळे यांनी कामकाज पाहिले. तर
पैरवी अधिकारी पोलीस हवालदार के. के. गायकवाड होते.