नांदूरशिंगोटे परिसरात बिबट्याची दहशत कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 00:50 IST2021-01-29T19:47:41+5:302021-01-30T00:50:57+5:30
नांदूरशिंगोटे : परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम असल्याने शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली आहे. शेतकरी व शेतमजुरांना रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा मुक्तसंचार असल्याने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नांदूरशिंगोटे परिसरात बिबट्याची दहशत कायम
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मानोरीरोड लगत असणाऱ्या वस्तीकडील शेतकऱ्यांना रात्री सात ते नऊ वाजेच्या दरम्यान अनेकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने घबराट निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील गहू, हरबरा, मका, कांदे व ऊस आदी पिके ऐन मोसमात असल्याने त्यांना पाणी देणे गरजेचे आहे. दर महिन्याला वीज वितरण कंपनीचे शेती पंपासाठी असणाऱ्या विजेचे वेळापत्रक बदलत असल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेकवेळा रात्री उशिरापर्यंत पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यात गेल्या काही दिवसांपासून येथे व परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. नाशिक-पुणे महामार्ग, नांदूरशिंगोटे - निमोणरोड, मानोरी रोड, व चासरोड या भागात अनेक शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन झाले आहेत. त्यामुळे बळीराजा शेतात काम करण्यासाठी धजावत नाही. मंगळवारी व गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मानोरीरोडलगत असणाऱ्या वस्तीकडे शेताकडे पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतमजुरांना बिबट्याचे दर्शन झाले. अंधार असल्याने भ्रमणध्वनीवरून आसपासच्या शेतकऱ्यांना बिबट्या आले असल्याचे त्यांनी सांगितले. शेतात अनेक ठिकाणी बिबट्याचे ठसेही आढळून आले आहे. गुरुवारी मध्यरात्री रामदास सानप यांच्या मक्याच्या शेतात दडून बसला आहे. वाड्या वस्तीवर अनेकदा रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. बिबट्या दररोज रात्री आपला मुक्काम वेगवेगळ्या ठिकाणी व आसपासच्या शेतात हालवत असल्याने वनविभागाची डोकेदुखी वाढत आहे. वनविभागाने या भागात पाहणी करून तसेच पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.