नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी शिवारात गुरुवारी (दि. २१) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास माजी सरपंच सुभाष पांडुरंग दराडे दुचाकीवरून घराकडे जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याने दहशत निर्माण झाली आहे. गत पंधरा दिवसांत चौथा हल्ला झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. माजी सरपंच सुभाष दराडे यांचे नांदूरशिंगोटे येथे खते व बी-बियाणे विक्रीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे दराडे दुकान बंद करून कासारवाडी - डोंगरगाव रस्त्याने वस्तीवर जात होते. घराजवळून काही अंतरावर असतानाच रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने दराडे यांच्या वर झडप घातली. सुदैवाने दराडे यांच्या अंगात संरक्षक जॅकेट असल्याने ते बचावले व शेजारच्या शेतातून बिबट्या पसार झाला. परिसरात गेल्या पंधरा दिवसांत दुचाकीस्वारावर चौथ्यांदा हल्ला झाल्याने दहशत निर्माण झाली आहे. नांदूरशिंगोटे येथे वनविभागाचे कार्यालय आहे तसेच येथील वनकर्मचारी रात्रीच्या वेळी गस्तीवर असणे आवश्यक असताना असे प्रकार घडत असल्याने विशेष गोष्ट आहे.
माजी सरपंचावर बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:33 IST