राज्य शासनाच्या उदासीनतेने कुंभमेळा धोक्यात

By Admin | Updated: July 21, 2014 02:01 IST2014-07-21T02:00:39+5:302014-07-21T02:01:46+5:30

राज्य शासनाच्या उदासीनतेने कुंभमेळा धोक्यात

Kumbha Mela threatens state government's apathy | राज्य शासनाच्या उदासीनतेने कुंभमेळा धोक्यात

राज्य शासनाच्या उदासीनतेने कुंभमेळा धोक्यात

 

नाशिक : दक्षिण गंगा असलेल्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर क्षेत्री मी यापूर्वीचे तीन कुंभमेळे अनुभवले आहेत. विशेषत: नाशिकच्या कुंभमेळ्यात सक्रिय सहभाग दिला आहे. परंतु कुंभमेळ्याच्या कामांना इतका विलंब पहिल्यांदाच होत आहे. राज्य सरकारची इतकी उदासीनता मी प्रथमच पाहत आहे. पुन्हा सरकार येण्याची शक्यता आहे किंवा नाही अशी शंका घेत, पुढील सरकार काय ते बघून घेईल अशा पद्धतीने सध्याच्या राज्य सरकारचे काम सुरू आहे. त्यामुळेच यंदाचे कुंभमेळा आयोजन धोक्यात आले आहे, असे मत निर्माेही अनी आखाड्याचे श्री महंत राजेंद्रदासजी महाराज यांनी व्यक्त केले.
कुंभमेळा तोंडावर आला आहे. परंतु चर्वितचर्वणाच्या पलीकडे काहीही हाती पडत नाही, अशी खंत व्यक्त करणाऱ्या राजेंद्रदास महाराज यांनी सांगितले की, नाशिकमधील तीन कुंभमेळ्यांचा अनुभव मला आहे. त्या अनुभवावरून सांगतो की, दरवेळी पुढील कुंभमेळा अधिक भव्यदिव्य होत असतो. देशातच नव्हे तर जगात धार्मिकता वाढते आहे. साधू-महंत आणि त्यांच्या खालशांमध्ये वाढत होत असते. गेल्या वेळेपेक्षा अधिक म्हणजे तीन ते चार लाख साधू-महंत पुढील वर्षी नाशिकला होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी येतील, तर तीन पर्वण्यांमिळून एक ते दीड कोटी भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरी येण्याची शक्यता आहे. जगात लाखो भाविकांच्या उपस्थितीत जे मोजके धार्मिक सोहळे होतात त्यात कुंभमेळ्याचा समावेश असतो. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक होते. परंतु कुंभमेळ्याचे काउंटडाऊन सुरू झाले असताना तसे चित्र मात्र दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले.
कुंभमेळ्यात येणाऱ्या आणि दोन ते तीन महिने वास्तव्य करणाऱ्या साधू-महंतांसाठी निवास व्यवस्था आणि पारंपरिक शाही मार्ग या दोन महत्त्वाच्या बाबी होत्या. जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त आणि महापौरांनी बोलावलेल्या साधू- महंतांच्या बैठकीत याबाबत महंतांनी सूचना केल्या होत्या. परंतु त्याचे पुढे काय झाले हे कळायला मार्ग नाही. साधुग्रामसाठी गेल्यावेळी असलेली जागा अपुरी पडण्याची शक्यता असल्याने मुबलक जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होती; परंतु गेल्यावेळी ज्या ठिकाणी साधुग्राम वसले तेथे धनदांडग्या भूमाफीयांनी बांधकामे केली असून, ती तातडीने हटविण्याची गरज आहे. साधुग्रामसाठी असलेल्या जागा अन्य कामांसाठी वापरण्यात आल्या आहेत. साधू-महंतांच्या आखाड्यांसाठी स्थायी व्यवस्था आणि बांधकामे करण्याची एक मागणी होती. परंतु त्याकडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. आता जागा मिळेल किंवा नाही याची शाश्वती नाही, असे सांगून ते म्हणाले की, कुंभमेळा हा परंपरेचा एक भाग आहे. त्यामुळे मिरवणुकीसाठी मार्गही पारंपरिकच राहणार आहे. हे ज्ञात असतानाही शाही मार्गाचे रुंदीकरणच करण्यात आलेले नाही. गेल्या वेळी शाही मार्गावर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. त्यामुळे आता तरीही शाही मार्गाचे रुंदीकरण झालेले नाही, असे ते म्हणाले.
काही कामे सुरू असल्याचे सांगितले जात आहे. रस्त्याची किंवा नदीपात्रातील घाटाची कामे सध्या सुरू आहेत. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी अशा प्रकारची कामे आवश्यकच आहेत. परंतु ही कामे सुरू असताना जेथे कुंभमेळा भरणार आहे, अशा रामकुंड आणि पंचवटी येथे रुंदीकरण जागा ताब्यात घेणे, शौचालये उभारणे, चोवीस तास पाणीपुरवठा करणे अशी कामे आवश्यक असतानाही ती केली जात नाहीत आणि शहराच्या इतर भागात तयारी करून काय उपयोग, असा प्रश्न त्यांनी केला.
यंदाच्या कुंभमेळ्याबाबत ना शासन गंभीर आहे, ना प्रशासन. जिल्हाधिकारी आणि मेळा अधिकारी गंभीर तर नाहीतच; परंतु त्यापेक्षा शासनच या कुंभमेळ्यासाठी गंभीर नाही. गेल्या कुंभमेळ्यात मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुढील कुंभमेळ्याचे नियोजन चांगले करण्याचे आश्वासन दिले होते. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनीही बैठका घेऊन खूप काही करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात शासकीय खात्यांमध्ये ना समन्वय, ना निधी असा सारा गोंधळ सुरू असताना, कुंभमेळा कसा पार पडणार हा प्रश्नच असल्याचे ते म्हणाले. अजूनही वेळ गेलेली नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच अन्य मंत्र्यांनी कुंभमेळ्याच्या कामांना गती द्यावी, तसेच केंद्राकडे निधी मागावा, केंद्रात धार्मिक वृत्तीचे सरकार असल्याने निधी मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही याची मला खात्री आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Kumbha Mela threatens state government's apathy