संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पादूकांचा ‘शिवशाही’तून प्रवास; आठ तासानंतर पंढरपूरात पोहचणार
By अझहर शेख | Updated: June 30, 2020 13:05 IST2020-06-30T12:18:24+5:302020-06-30T13:05:19+5:30
देशावर अन् राज्यावर आलेले कोरोनाचे संकट टळू दे..., असेच साकडे निवृत्तीनाथ महाराजांना घातले असून पंढरपूराच्या राजाकडेही त्यांचे प्रतिनिधी म्हणून हेच मागणे आम्ही मागणार...

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पादूकांचा ‘शिवशाही’तून प्रवास; आठ तासानंतर पंढरपूरात पोहचणार
नाशिक : राज्यासह संपुर्ण देश आणि जग सध्या कोरोना या महामारीचा मुकाबला करत आहेत. याच पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाने सामाजिक भान जपत आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमधून संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पादूकांची पालखी थेट ‘शिवाशाही’ बसमधून पंढरपूरात नेण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता २० वारकरी भक्त टाळ-मृदुंगांच्या गजरात पालखीला घेऊन बस त्र्यंबकमधून पंढरपूराच्या दिशेने रवाना झाली. ‘आतापर्यंत आम्ही संत निवृत्तीनाथ महाराज अन् विठूरायांच्या भक्तांची वाहतूक केली; मात्र आज चक्क देवाचे सारथ्य करण्याचा योग लाभला’’ अशी भावना बसच्या दोघा चालकांनी व्यक्त करत विठूनामाचा जयघोष केला.
लाखो वारकऱ्यांचा त्र्यंबकनगरीत भरलेला मेळा...देहभान हरखून विठूनामाच्या भक्तीन टाळ-मृदूंगाचा गजर करत लीन झालेले वारकरी भक्त असे चित्र आषाढी एकादशीला त्र्यंबक शहरात पहावयास मिळते. यंदा मात्र हे चित्र नजरेस पडले नाही. काही मोजक्याच वारकºयांच्या उपस्थितीत पादूकांची पालखी त्र्यंबकनगरीतून पंढरपूराकडे रवाना झाली.
बसमध्ये वीस वारक्यांत एक वीणेकरी, झेंडेकरी, टाळकरी यांचाही समावेश आहे. सकाळी तीर्थराज कुशावर्तावर निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांची विधीवत पूजा नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर यांनी सपत्नीक पूजा केली. जयंतमहराज गोसावी यांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात पुजाविधी केला.