जावडेकर यांचा दावा : स्वतंत्र विदर्भाबाबत योग्य वेळी घेणार निर्णय

By Admin | Updated: September 30, 2014 22:54 IST2014-09-30T22:54:22+5:302014-09-30T22:54:45+5:30

शिवसेनेशिवाय भाजपाला मिळणार बहुमत

Javadekar's claim: Decision to take independent Vidarbha at the right time | जावडेकर यांचा दावा : स्वतंत्र विदर्भाबाबत योग्य वेळी घेणार निर्णय

जावडेकर यांचा दावा : स्वतंत्र विदर्भाबाबत योग्य वेळी घेणार निर्णय

नाशिक : १९७८ नंतर प्रथमच महाराष्ट्रात राजकीय इतिहास बदलत असून, आघाडीऐवजी प्रथमच एका पक्षाला बहुमत मिळून सत्ता येणार आहे, असा दावा भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.
शिवसेना बरोबर नसतानाही भाजपाला यश मिळेल काय, या प्रश्नावर त्यांनी भाजपालाच सत्ता मिळेल, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, स्वतंत्र विदर्भाबाबत भाजपा ठाम असून, त्याबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल, असा दावा त्यांनी केला.
विधानसभा प्रचारासाठी मुलुखमैदान या उपक्रमांतर्गत नाशिकला आलेल्या प्रकाश जावडेकर यांनी वसंतस्मृती येथे पत्रकारांशी बोलताना कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीवर कडाडून टीका केली. दोन्ही पक्ष एकमेकांच्या पापात सहभागी होण्यास तयार नाहीत असे सांगत आहेत; परंतु पंधरा वर्षे त्यांनी संयुक्त पातक केले आहे. त्यामुळे त्यांना त्याची शिक्षा भोगावीच लागेल, असे सांगून त्यांनी या निवडणुकीत भाजपा महायुती निवडणूक लढवित आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाच्या यशाची प्रचिती आली आहे. राज्यात हीच परिस्थिती होणार असून, भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल, असा दावा त्यांनी केला. शिवसेनेशिवाय हे यश मिळेल, यालाही त्यांनी दुजोरा दिला.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर कॉँग्रेस आणि आपला पक्ष एकत्र येऊ शकतात, असे म्हटले आहे. याबद्दल जावडेकर यांनी शरद पवार यांचे अभिनंदन करीत, त्यांनी हे अगोदरच कबूल केले हे बरे असल्याचे सांगितले.
परंतु विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला गरज भासल्यास शिवसेनेला बरोबर घेणार काय, या मुद्द्याला सोयीने बगल देत ते त्याच वेळी समजेल, असे सांगितले. भाजपाला स्वतंत्र विदर्भ हवा आहे, या मुद्द्यावरही त्यांनी बोलताना स्वतंत्र विदर्भ ही भाजपाची सैद्धांतिक भूमिका असून, त्यात स्थळ, काळ परत्वे योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Javadekar's claim: Decision to take independent Vidarbha at the right time