बुद्धस्मारक परिसरात जय भीमचा जयघोष

By Admin | Updated: October 12, 2016 00:51 IST2016-10-12T00:50:20+5:302016-10-12T00:51:31+5:30

धम्मचक्र प्रवर्तन दिन : हजारो समाज बांधवांची उपस्थिती; विविध कार्यक्रम

Jai Bhimcha Jayabhosh in Buddha Smarak area | बुद्धस्मारक परिसरात जय भीमचा जयघोष

बुद्धस्मारक परिसरात जय भीमचा जयघोष

नाशिक : दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक उत्साहात आणि जय भीमच्या घोषाने त्रिरश्मी लेणी आणि पायथ्याजवळ असलेल्या बुद्धस्मारकात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टतर्फेआयोजित कार्यक्रमाची सुरुवात धम्मध्वजारोहण आणि बुद्धवंदनेने झाली.
धम्मध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, ट्रस्टचे अध्यक्ष भन्ते सुगत, नगरसेवक प्रकाश लोंढे, संजय साबळे, कविता कर्डक, किशोर तेजाळे, जितेंद्र दिवे तसेच भन्ते विमल कीर्ती, आनंद सुमन, श्रीरत्नप्रिय, रत्नज्योती आदिंसह पंचवीस भिक्खू संघ उपस्थित होते. यावेळी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. हरीश भालेराव व सोमनाथ गायकवाड यांच्या कलापथकाने भीम गीतांचा कार्यक्र म सादर केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही याठिकाणी खिरदान करण्यात आले. विविध मंडळांच्या वतीने याठिकाणी येणाऱ्या समाज बांधवांचे स्वागत करण्यात आले. पांढरे वस्त्र परिधान केलेल्या समाज बांधवांची सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी होत होती. सायंकाळपर्यंत विविध सांस्कृतिक उपक्रमांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात रंग भरला. शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या समाज बांधवानी मोठी गर्दी करीत जय भीमचा जयघोष केला. दरम्यान या ठिकाणी शिघ्रकृती दलाच्या जवानांसह पोलीस उपायुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)

Web Title: Jai Bhimcha Jayabhosh in Buddha Smarak area