Isolation center for five and a half patients in five places in Baglan taluka | बागलाण तालुक्यात पाच ठिकाणी साडेसातशे रूग्णांसाठी विलगीकरण केंद्र

बागलाण तालुक्यात पाच ठिकाणी साडेसातशे रूग्णांसाठी विलगीकरण केंद्र

सटाणा : कोरोनाचा मालेगावात शिरकाव झाल्याने प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली आहे. कोरोनाला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून संभाव्य संशयित आणि बाधित रु ग्णांसाठी सटाणा शहरासह तालुक्यात पाच ठिकाणी साडेसातशे रु ग्णांसाठी विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत.
बागलाण तालुक्यात कोरोना संशयित रु ग्णांसाठी यापूर्वी सटाणा, नामपूर आणि डांगसौंदाणे या तिन्ही ग्रामीण रु ग्णालयात प्रत्येकी दहा खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपूर्वी सटाण्यापासून अवघ्या ३४ किलोमीटर अंतरावरील मालेगाव शहरात कोरोना बाधित रु ग्णाचा मृत्यू झाल्याबरोबरच बाधित रु ग्ण सापडल्याने संपूर्ण कसमादे परिसर हादरून गेला आहे. गावागावात कडकडीत बंद पाळला जात आहे. दोन दिवसांपासून मालेगावात रु ग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्काळ संभाव्य रु ग्ण आणि संशयित रु ग्णांसाठी विलगीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे .त्यासाठी शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग पाडण्यात आले आहेत. शहरासाठी तीन ठिकाणी तर ग्रामीणसाठी दोन ठिकाणी असे पाच विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत. याच्यात तब्बल साडेसातशे रु ग्णाची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये स्वयंपाक गृह ,पाणी ,स्वच्छता गृह ,विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे.
मालेगावच्या लोंढ्यांमुळे पाच हॉट स्पॉट ...
संचारबंदी लागू असतांनाही पोलीस यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे लॉक डाऊन काळात सटाणा शहरासह अंतापूर ,नामपूर ,जायखेडा ,ताहाराबाद येथे मालेगाव येथून लोंढेच्या लोंढे येत होते .दरम्यान दोन दिवसांपासून मालेगावात कोरोनाच्या रु ग्णांमध्ये वाढ झाल्याने मालेगावचे बहुतांश रहिवाशी ग्रामीण रस्त्यांचा शोध घेऊन नातेवाईकांचा आश्रय घेत आहेत. त्यामुळे शेकडो लोक संपर्कात आल्यामुळे या पाच गावांकडे आजतरी हॉट स्पॉट म्हणून पाहिले जात आहे. त्यातच सटाणा शहरात न्हावी गल्ली ,पाटोळे गल्ली व पुंडलिकनगर येथे दहा जणांना विलगीकरणाचा शिक्का मारला असतांनाही हे दहा जण नियमांचे पालन न करता राजरोसपणे शहरातून फिरत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.
सटाणा शहरातील अपंग कल्याण केंद्र, देवमामलेदार यशवंतराव महाराज देवस्थान ट्रस्ट, श्री शिव छत्रपती मराठा मुलींचे वसतीगृह तसेच अजमिर सौंदाणे येथील शासकीय एकलव्य मॉडेल स्कूल ,ताहाराबाद येथील सिद्धी इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी संभाव्य व संशयित रु ग्णांसाठी प्रत्येकी १५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची व्यवस्था करण्याचे आदेश संबधित यंत्रणेला दिले आहेत.
- जितेंद्र इंगळे पाटील ,तहसीलदार ,बागलाण

मालेगाव शहरात कोरोना बाधितांची संख्या ही बागलाणसाठी धोक्याची घंटा आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बागलाणवासियांनी लॉक डाऊनच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने घरातून बाहेर पडू नये तसेच बाहेरच्या नागरिकांच्या संपर्कात येऊ नये तसेच लॉक डाऊनच्या काळात बाहेरगावच्या पाहुण्यांना आश्रय देणे हासुद्धा गुन्हा आहे .त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी तत्पर राहावे .
- दिलीप बोरसे ,आमदार ,बागलाण

Web Title:  Isolation center for five and a half patients in five places in Baglan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.