हृदयद्रावक! अंत्यविधीहून परतणाऱ्या पती-पत्नीवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 13:33 IST2025-01-18T13:33:01+5:302025-01-18T13:33:20+5:30
दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना रस्त्यातच दोघांची प्राणज्योत मावळली.

हृदयद्रावक! अंत्यविधीहून परतणाऱ्या पती-पत्नीवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
Nashik Accident: नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुरणगाव येथील आत्मा मालिक गुरुकुलासमोर अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत अंत्यविधीहून परतणारे पती-पत्नी ठार झाल्याची घटना घडली. घटनेनंतर अज्ञात वाहनचालक फरार झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जळगाव नेऊर येथील राधाकृष्ण रामभाऊ कुन्हाडे (६६) व पद्माबाई राधाकृष्ण कुन्हाडे (६३) हे दाम्पत्य कोपरगाव तालुक्यातील धोत्रे भोजाडे येथे अंत्यविधीच्या कार्यक्रमास गेले होते. कार्यक्रम आटोपून कुन्हाडे दाम्पत्य गुरुवारी (दि. १६) रात्री ९ वाजेच्या सुमारास घरी परतत होते. पुरणगाव येथील आत्मा मालिक गुरुकुलासमोर विरुद्ध दिशेने येत असलेल्या अज्ञात वाहनाने मोटारसायकल (एम.एच.-१५- सिक्यू-४०६२) ला धडक दिली. अपघातात पती-पत्नी जखमी झाले. अपघाताची माहिती जळगाव नेऊर येथील तरुणांना समजताच त्यांनी जखमींना येवला येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना रस्त्यातच दोघांची प्राणज्योत मावळली.
शुक्रवारी (दि. १७) सकाळी शवविच्छेदनानंतर दोघांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अज्ञात वाहनचालक मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.