'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 19:45 IST2025-10-17T19:44:12+5:302025-10-17T19:45:40+5:30
Nashik Crime Latest News: नाशिकमध्ये एका उद्योजकाला प्रेमाचा मोहात अडकवून कोट्यवधी रुपये उकळल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यानंतर खळबळजनक माहिती समोर आली.

'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
Nashik Latest News: फेसबुकवर एका अनोळखी महिलेने पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकार करणे एका उद्योजकाला चांगलेच महागात पडले. एक महिला फोन करायची, गोड बोलायची. त्याच आवाजाच्या मोहात उद्योजक अडकला आणि पैसे लुटण्याची सुरुवात झाली. वेळोवेळी त्या सायबर गुन्हेगाराने क्रिप्टो चलनात गुंतवणूक करण्यास सांगून २ कोटी ७८ लाख ५० हजारांचा गंडा घातला.
क्रिप्टो चलनात गुंतवणुकीवर नफा मिळविण्याच्या दामदुप्पट लालसेपोटी विविध प्रकारचा माल आयात-निर्यात करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील एका फिर्यादी उद्योजकासोबत अनोळखी महिलेने वेळोवेळी संपर्क साधला.
उद्योजकाने त्या महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक केली. तब्बल पावणेतीन कोटी रुपये आपण गमावून बसलो हे जेव्हा लक्षात आले, तेव्हा त्या उद्योजकाच्या पायांखालून जमीन सरकली अन् त्याने ग्रामीण सायबर पोलिस ठाणे गाठले.
नाशिकच्या प्रकरणाचे केरळपर्यंत धागेदोरे
पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी याबाबत सायबर पोलिसांना आदेश दिले. पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी २२ ऑगस्ट रोजी फिर्याद घेत गुन्हा नोंदविला आणि तपासचक्रे फिरविली. या गुन्ह्यातील बँक खाते व फसवणूक करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत तांत्रिक माहिती मिळवून पथकाने केरळ गाठले.
तेथील कोझीकोडे व शिवापुरम भागांत केरळ पोलिसांच्या मदतीने ग्रामीण सायबर पोलिसांच्या पथकाने संशयित आरोपी बँक खातेधारक सजा हनुन (रा. वेलापल्लम, केरळ), अब्दुल बासिथ थंगल (रा. कोझीकोडे) यांना शिताफीने ताब्यात घेतले.
एक इंजिनिअर, दुसरा कृषीचा पदव्युत्तर पदवीधारक
ग्रामीण सायबर पोलिसांनी अटक केलेले संशयित आरोपी सजा हनुन व अब्दुल थंगल हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. - एकाने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहेत, तर दुसरा कृषिविज्ञान शाखेचा पदव्युत्तर पदवीधारक आहे.
त्यांनी केरळमध्ये चांगल्या प्रकारे 'सेटअप' उभारला असून सायबर गुन्हेगारांमार्फत त्यांच्या बँक खात्यात आलेली रक्कम काढून घेत ती 'हवाला'मार्फत परदेशात पोहोचविली जात असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.