सभागृह मनपाचे, आर्थिक हित मात्र मंडळाचे
By Admin | Updated: January 20, 2016 23:26 IST2016-01-20T23:23:48+5:302016-01-20T23:26:06+5:30
आर्थिक लूट : ठाकरे सभागृहाचा मंडळाकडून गैरवापर

सभागृह मनपाचे, आर्थिक हित मात्र मंडळाचे
सिडको : स्वामी विवेकानंदनगर येथील प्रबोधनकार ठाकरे सभागृह चालविणाऱ्या मंडळाकडून लग्न, तसेच अन्य कार्यक्रमांसाठी अवाच्या सवा शुल्क आकारून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप नगरसेवक अॅड. अरविंद शेळके यांनी प्रभाग बैठकीत केला आहे. प्रशासनाने त्या मंडळावर तत्काळ कारवाई करून सभागृहाला टाळे ठोकावे, अशी मागणीही शेळके यांनी केली आहे.
सिडको प्रभागाच्या बुधवारी झालेल्या सभेत नगरसेवक शेळके यांनी सांगितले की, प्रबोधनकार ठाकरे सभागृह हे मनपाने श्री शिव छत्रपती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळास नाममात्र भाडे तत्त्वावर दिले आहे. हे सभागृह आरक्षणानुसार व्यायामशाळा, वाचनालय तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी आहे. परंतु मंडळाने सर्व नियम धाब्यावर बसवत याठिकाणी लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस आदि कार्यक्रमच अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या सभागृहालगतच नागरिकही राहतात. लग्न समारंभाच्या वेळी अनेकदा डीजेचा वापर होत असल्याने नागरिकांना याचा त्रास होतो. सिडको ही कामगार वस्ती असल्याने सर्वसामान्य नागरिक हे येथे लग्न समारंभ करतात. या लग्न समारंभासाठी मंडळाने नागरिकांकडून नाममात्र भाडे घेणे गरजेचे असताना मंडळ सात हजार रुपये भाडे घेत असल्याने ही आर्थिक लूट असल्याचा आरोप नगरसेवक शेळके यांनी केला आहे.
याबरोबरच महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून याच मंडळाच्या माध्यमातून अभ्यासिका चालविण्यासाठी देण्यात आली आहे. या ठिकाणीही मंडळाकडून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अधिक रक्कम घेत आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांनी प्रभाग सभेत केला. तसेच सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या या मंडळाकडून अभ्यासिका चालविण्यात येत असलेली मनपाची जागा त्वरित ताब्यात घ्यावी, असेही जायभावे यांनी सांगितले. (वार्ताहर)