निम्मे शहर सामसूम : नाशिकमध्ये मराठा आंदोलक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 16:44 IST2018-08-09T16:39:08+5:302018-08-09T16:44:14+5:30
डोंगरे वसतिगृह मैदानावरही दोन वाहानांच्या काचा आंदोलकांकडून फोडण्यात आल्या. आंदोलकांनी मैदानावरून राजकीय नेत्यांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखविला.

निम्मे शहर सामसूम : नाशिकमध्ये मराठा आंदोलक आक्रमक
नाशिक : आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांतीदिनाच्या पार्श्वभूमीवर आज गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीदरम्यान घेण्यात आला होता. या निर्णयानुसार आंदोलनाला सकाळी दहा वाजता मैदानावर प्रारंभही झाला. मात्र या दरम्यान, अंतर्गत मतभेद आणि राजकीय नेतेमंडळीच्या हस्तक्षेपामुळे आंदोलकांमध्ये ठिणगी पडली. ठिय्या आंदोलन करणारे आंदोलक अचानकपणे आक्रमक झाले आणि आंदोलकांचा गट मैदानावरून शहरातील बाजारपेठेच्या दिशेने सरकला. यावेळी आंदोलकांनी मेहेर सिग्नल चौकात हुल्लडबाजी करत दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडत ‘खाकी’स्टाईलने जमाव पांगविला. याचदरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावरही दोन वाहानांच्या काचा आंदोलकांकडून फोडण्यात आल्या.

शहरात शुकशुकाट; वर्दळ मंदावली
मराठा समाजाच्या आंदोलनातील आंदोलक आक्रमक झाल्यामुळे शहरातील गंगापूररोड, कॉलेजरोड, शरणपूररोड, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, शालिमार, रविवारकारंजा, मेनरोड, शिवाजीरोड, भद्रकाली, जुने नाशिक या संपुर्ण भागात शुकशुकाट पसरला आहे. सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त असून दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव दलाची तुकडी गस्तीवर आहे.

