माणेकशानगरात घरांमध्ये नळाला गटारीचे पाणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:40 IST2019-03-23T00:39:39+5:302019-03-23T00:40:07+5:30
शहरातील द्वारका परिसरात माणेकशानगरातील दहा ते बारा सोसायट्यांना नळाद्वारे गटारीचे पाणी येत असून, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून केवळ खोदकाम सुरू असून, त्यात कुठलाही दोष सापडलेला नाही आणि दुसरीकडे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत.

माणेकशानगरात घरांमध्ये नळाला गटारीचे पाणी !
नाशिक : शहरातील द्वारका परिसरात माणेकशानगरातील दहा ते बारा सोसायट्यांना नळाद्वारे गटारीचे पाणी येत असून, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून केवळ खोदकाम सुरू असून, त्यात कुठलाही दोष सापडलेला नाही आणि दुसरीकडे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत.
महापालिकेच्या वतीने शहर स्मार्ट केले जात आहे. त्यातच जलवाहिन्या बदलून मोठ्या प्रमाणात नवीन जलवाहिन्या टाकल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर स्काडा मीटर बसवून पाणीपुरवठा स्मार्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे स्मार्ट यंत्रणेला गेल्या चार दिवसांपासून साधा फॉल्टदेखील सापडत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
माणेकशानगर येथील न्यू रश्मी, बालाजी, जीवनज्योती अशा विविध सोसायट्या आणि बंगले परिसर असून, त्याठिकाणी महापालिकेच्या जलवाहिनीतून गटारीचे पाणी मिसळले जात आहे. घरातील पाणी काळे आणि दुर्गंधीयुक्त येत असल्याने नागरिकांनी त्यासंदर्भात महापालिकेच्या ई-कनेक्ट अॅपवर तक्रारी केल्या. त्यानंतर यंत्रणा हालली, मात्र चार दिवसांपासून महापालिकेचे तीन ते चार कर्मचारी येऊन खोदकाम करतात आणि नंतर निघून जातात. फॉल्ट सापडत नाही असे सांगून टाळाटाळ केली जात आहे.
नागरिकांना मात्र त्यामुळे काळ्या पाण्याची शिक्षा सहन करावी लागत आहे. परिसरातील सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये काळा गाळ साचला आहे.
तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांकडे तक्रारी करूनदेखील बघतो करतो, असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर निवडणूक आचारसंहितेमुळे थेट पुढे येऊन काम करता येत नाही असे सांगून नगरसेवक टाळाटाळ करीत करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
४प्रदूषित पाण्यामुळे परिसरात रोगराईचा धोका असून, महापालिकेने त्वरित नागरिकांची या समस्येतून मुक्ती करावी अन्यथा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.