Nashik Kumbh Mela: 'गेल्या कुंभमेळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, याही कुंभमेळ्यात तेच मुख्यमंत्री आहेत. मागील सिंहस्थात मीच कुंभमेळा मंत्री होतो, याहीवेळेस मीच कुंभमेळा मंत्री आहे. गेल्यावेळीही मीच पालकमंत्री होतो; पण या कुंभमेळ्यात पालकमंत्री नाही; पण पुढे बघू,' असे म्हणत आपली पालकमंत्रिपदाची इच्छा कायम असल्याचे जलसंपदा मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
मुंबई महामार्गावरील एका हॉटेलमध्ये किर्लोस्कर वसुंधरा आयोजित 'ग्रीन कुंभकॉन्फरन्स'च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महाजन म्हणाले, 'आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून कोट्यवधी भाविक येण्याची शक्यता असल्याने प्रशासनासमोर गर्दीच्या नियोजनाचे मोठे आव्हान आहे. नुकत्याच झालेल्या प्रयागराजच्या कुंभात चार ते पाचपट अधिक गर्दी होती. सध्या निसर्गाचा समतोल चांगला राहण्यासाठी प्रत्येकानेच आपले योगदान देणे गरजेचे आहे. आगामी कुंभ आधुनिक टेक्नॉलॉजी वापरून एआय पद्धतीचा करू; तसेच लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे महाजन यांनी सांगितले.
अकरा नद्यांचे पाणी आणत कुंभस्थापना
ग्रीन कॉन्फरन्सचे उद्घाटन गोदावरी, अहिल्या, नंदिनी, वरुणा, कपिला, वालदेवी, अगस्ती, मोती, म्हाळुंगी, विनिता, विजया या नद्यांचे पाणी आणून ते आर्किटेक्ट राजेश्वरी पाटील यांनी तयार केलेल्या एका कलशात मान्यवरांच्या हस्ते टाकण्यात आले. ज्याप्रमाणे घटस्थापनेला सुरुवात होत आहे, त्याचप्रमाणे कुंभस्थापना करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
खासदार वाजे यांची खदखद
यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी कुंभमेळा नियोजन समितीच्या बैठकांना बोलाविले जात नसल्याबद्दल खंत व्यक्त करत आजच्या कॉन्फरन्सला बोलाविले त्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, हरित कुंभ यशस्वी होण्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देऊ नका. सर्वांनीच सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत.