किराणा दुकान फोडले; ४० हजारांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:37 IST2019-05-14T23:16:56+5:302019-05-15T00:37:52+5:30
देवळाली कॅम्प येथील हौसन रोडवरील कमल किराणा स्टोअर्सचा दरवाजा तोडून गल्ल्यातील ४० हजार रुपये, तर शेजारी बिझनेस बॅँकेच्या एटीएममध्ये घुसून तेथील कागदपत्रे लंपास करत चोरट्यांनी धुमाकूळ घातला.

किराणा दुकान फोडले; ४० हजारांची रोकड लंपास
देवळाली कॅम्प : येथील हौसन रोडवरील कमल किराणा स्टोअर्सचा दरवाजा तोडून गल्ल्यातील ४० हजार रुपये, तर शेजारी बिझनेस बॅँकेच्या एटीएममध्ये घुसून तेथील कागदपत्रे लंपास करत चोरट्यांनी धुमाकूळ घातला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हौसन रोडवरील कमल किराणा स्टोअर्समध्ये रविवारी विक्री झालेल्या मालाची रोख रक्कम बॅँकेत भरण्यासाठी ठेवली होती. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी विनोद वाधवानी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचा दरवाजा उघडा होता, तर कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. त्यांचे बंधू दीपक यांना कळवून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याला चोरीची माहिती कळविली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत तक्रार दाखल करून घेतली.
याच दुकानात जवळील बिझनेस बॅँकेच्या एटीएममध्ये चोरट्यांनी घुसून तेथील काही कागदपत्रांसह पोलीस व्हिजीट बुक लंपास केले. एटीएमच्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे. लॅमरोड परिसरातील नाका नं. ६ येथे भूषण शिरसाठ यांच्या ट्रकची बॅटरी व जॅक, टुलकिट असे अंदाजे २८ हजार रुपये किमतीच्या साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.