Video - नाशिकमध्ये गोदावरीचा पूर धोक्याच्या पातळीच्या दिशेने; इशारा पातळी ओलांडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:48 IST2025-09-28T13:46:10+5:302025-09-28T13:48:00+5:30
नाशिक शहर व परिसरासाठी रविवारी हवामान खात्याकडून ‘ऑरेंज’ तर जिल्ह्यातील घाट प्रदेशात दोन दिवसांचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

Video - नाशिकमध्ये गोदावरीचा पूर धोक्याच्या पातळीच्या दिशेने; इशारा पातळी ओलांडली
नाशिक : शहरासह जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासून संपूर्ण रात्रभर आणि रविवारी (दि. २८) दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व लहान-मोठी धरणे यापूर्वीच १०० टक्के भरल्यामुळे रविवारी दुपारी धरणांमधून वेगाने विसर्ग केला जात आहे. गंगापूर धरणामधून सुद्धा ८,६८४ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी नदीच्या पुराने दुपारी साडे बारा वाजता इशारा पातळी ओलांडली. गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने दर तासाला वेगवान विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे. यामुळे नदीकाठालगत असलेल्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर धोक्याच्या पातळीच्या दिशेने वेगाने जात आहे.
नाशिक शहर व परिसरासाठी रविवारी हवामान खात्याकडून ‘ऑरेंज’ तर जिल्ह्यातील घाट प्रदेशात दोन दिवसांचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यानुसार शनिवारी रात्री ८ वाजल्यापासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली असून, रविवारी शहरात मागील २८ तासांत ९९.६ मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद येथील भारतीय हवामान निरीक्षण केंद्रात करण्यात आली आहे. हंगामात १ जूनपासून आतापर्यंत शहरात ११०० मिमी इतका पाऊस मोजण्यात आला आहे. मागील २४ तासांपासून नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे.
नांदुरमध्यमेश्वर, दारणा, पालखेड, पुणेगाव, चणकापूर, वाघाड, करंजवण आदी धरणांमधून विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे गोदावरी, दारणा, कादवा यासारख्या मोठ्या नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. नांदुरमध्यमेश्वर धरणातून दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ६८,४८० क्युसेक पाण्याचा विसर्ग पुढे जायकवाडीच्या दिशेने झेपावला. यामुळे लासलगाव-सिन्नर राज्य मार्गावरील नांदुरमध्यमेश्वर पूल प्रशासनाकडून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हा पूल मुंबई-आग्रा व नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाला निफाड तालुक्यातून जोडतो.
गोदावरीचा पूर धोक्याच्या पातळीच्या दिशेने सरकला असून पुराचे पाणी रामसेतूला लागले आहे pic.twitter.com/sxzZvWRzgA
— Lokmat (@lokmat) September 28, 2025
गोदाकाठावरील मंदिरांना वेढा
गोदाकाठालगतच्या सर्व मोठ्या मंदिरांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. तसेच लहान मंदिरे पुराच्या पाण्याखाली बुडाली आहेत. पुराचे पाणी रामसेतूवरून वाहू लागले आहे. दुतोंड्या मारुतीची मूर्ती पुराच्या पाण्यात मानेपर्यंत बुडाली असून, गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच आहे. शहरातही पावसाचा जोर कायम असल्याने दुतोंड्या मारूती बुडणार आहे. तसेच रामसेतू पुलावरून पुराचे पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पंचवटी, तपोवन, जुने नाशिक या गावठाण भागात नदीकाठालगत सतर्कतेचा इशारा दिला जात असून, सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत.
नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे. यामुळे एकुण विसर्ग हा ९८२८क्यूसेक इतका होणार आहे. सध्या होळकर पुलाखालून पुढे १३०४६ क्यूसेक पाणी (इशारा पातळी ओलांडली ) प्रवाहित झालेले आहे. दुपारी २ वाजेनंतर गोदावरीचा पूर धोक्याच्या… pic.twitter.com/yp1nx3vW7a
— Lokmat (@lokmat) September 28, 2025