Girish Mahajan was the only danger for the mayor | महापौरपदासाठी गिरीश महाजनच ठरले संकटमोचक
महापौरपदासाठी गिरीश महाजनच ठरले संकटमोचक

नाशिक : बहुमत असतानाही पक्षात फाटाफूट आणि दुसरीकडे विरोधी पक्षांची वाढती ताकद, त्यातच पक्षांतर्गत उमेदवारीसाठी रस्सीखेच या सर्व पार्श्वभूमीवर संकटात सापडलेल्या भाजपसाठी पक्षाचे नेते गिरीश महाजन पुन्हा एकदा ‘संकटमोचक’ ठरले. त्यांनी बहुमताची जुळणी केलीच, परंतु पक्षाची सत्ता कायम ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून त्यांनी पुन्हा एकदा पालकत्व सिद्ध केले.
राज्यात गेली पाच वर्षे भाजपची सत्ता असताना महाजन हे नाशिकचे पालकमंत्री तर होतेच, परंतु २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे ६५ नगरसेवक निवडून आणण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. आता सत्ता नसली तरी त्यांनी नाशिकचे खऱ्या अर्थाने पालकत्व निभावले.
महापालिकेत भाजपची सत्ता असून, बहुमतदेखील आहे. मात्र, दहा ते पंधरा नगरसेवक फुटण्याच्या चर्चेमुळे गेल्या सात दिवसांपासून भाजपचे स्थानिक नेते तणावात होते. त्यातच शिवसेनेने महाशिवआघाडी तयार करताना विरोधकांबरोबरच भाजपचे अनेक नगरसेवक फोडल्याचे सांगितले गेल्याने अधिकच अडचण झाली. राज्यातील सत्तेच्या घडामोडींमुळे गिरीश महाजन त्यात व्यस्त असले तरी त्यांनी नाशिकमध्ये अपेक्षेनुरूप लक्ष घातले. एकीकडे पक्षातील सुयोग्य उमेदवार ठरविणे आणि दुसरीकडे विरोधी आघाडीतून भाजपला अनुकूल निर्णय करून घेणे अशी दुहेरी कसरत ते करीत होते. गोवा सहलीवर असलेल्या नाशिकच्या नगरसेवकांशी चर्चा केल्यानंतर सत्तापदे त्याच त्या नगरसेवकांना नको आणि ज्यांना कोणतेही सत्तापद मिळाले नाही त्यांनाच संधी देण्याची मागणी होती. ती मान्य करून त्यांनी सतीश कुलकर्णी यांना संधी दिलीच, परंतु दुसरीकडे भिकूबाई बागुल यांना संधी दिली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांच्या त्या मातोश्री असून, बागुल यांचा दबदबा बघता फुटण्याचे कोणी धाडस करणार नाही अशीही खेळी यामागे होती.
कॉँग्रेसने काहीही कारणे सांगितली तरी त्यांना शिवसेनेपासून परावृत्त करण्यातदेखील भाजपची पर्यायाने महाजनांची खेळी यशस्वी झाली तर अगोदरच मनसेलादेखील गळाला लावले गेले. या सर्व व्यूहरचनेमुळे नाशिकमध्ये कथित महाशिवआघाडीचा बार फुसका ठरला.
सर्वांत महत्त्वाची अडचण भाजप बंडखोरांची होती. माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक असलेल्या बंडखोरांना वेगवेगळ्या प्रकारे समजावून पक्षातच आणण्याची त्यांची खेळी हा ‘मास्टर स्ट्रोक’ होता. त्यामुळे विरोधकांचे अवसानच गळाले आणि भाजपची सत्ता आणि प्रतिष्ठा राखली गेली.
धुळ्याच्या कन्या नाशिकच्या उपमहापौर
उपमहापौरपदी निवडून आलेल्या भिकुबाई बागुल या मूळच्या धुळे येथील आहेत. देवपूर परीसरात त्यांचे माहेर आहे. त्या नाशिकमध्ये वास्तव्यास आहेत. नाशिक महापालिकेत त्या तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. भिकुबाई या ८५ वर्षांच्या असून, नाशिक महापालिकेतच नव्हे तर राज्यातील सर्व महापालिकेत सर्वाधिक वयाने ज्येष्ठ असलेल्या त्या नगरसेविका आहेत हे विशेष !

Web Title:  Girish Mahajan was the only danger for the mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.