खरातचे बँक खाते सील, १,५०० कोटींच्या संपत्तीवर नजर; निधीचा स्रोत शोधण्यावर तपास केंद्रित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 06:59 IST2026-03-27T06:59:18+5:302026-03-27T06:59:18+5:30
विशेष तपास पथकाने खरात व त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, प्लॉट, फ्लॅट, व्यावसायिक जागा, वाहने अशा सर्व मालमत्तेची माहिती मागवली आहे.

खरातचे बँक खाते सील, १,५०० कोटींच्या संपत्तीवर नजर; निधीचा स्रोत शोधण्यावर तपास केंद्रित
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी कारवाई सुरू केली असून त्याच्या कथित १,५०० कोटींपेक्षा अधिक मालमत्तेवर विशेष तपास पथकाची (एसआयटी) करडी नजर गेली आहे. खरातशी संबंधित प्रॉपर्टीची कागदपत्रे जप्त करण्यासह बँक खाते सील करण्यात आले आहे. या संपत्तीमागील निधीचा स्रोत शोधण्यावर तपास सध्या केंद्रित केला गेला आहे.
संपत्ती कुठे-कुठे? : विशेष तपास पथकाने खरात व त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, प्लॉट, फ्लॅट, व्यावसायिक जागा, वाहने अशा सर्व मालमत्तेची माहिती मागवली आहे. राज्यभरात त्याने नेमकी किती आणि कुठे-कुठे गुंतवणूक केली, याचा तपशील गोळा करण्यासाठी नोंदणी विभागाची मदत घेण्यात येत आहे.
'कोट्यवधी साम्राज्या' मागे ईडी, कस्टमचा ससेमिरा
भोंदू अशोक खरातचे कोट्यवधीचे आर्थिक 'उद्योग' बघता आता त्याच्या मागे ईडी, विदेशी चलन (फॉरेक्स) आणि कस्टमचाही ससेमीरा लागण्याची चिन्हे आहेत. खरातच्या व्यवहाराची कागदपत्रे आता सक्त वसुली संचनालयाकडे (इडी) देण्यात येणार असल्याचे समजते. त्याच्या विदेश दौऱ्यांची व विदेशी चलन व्यवहारांची फॉरेक्सकडून चौकशी होणार आहे, त्याने तुर्कस्थानमधून आणलेल्या फर्निचरप्रमाणेच अन्य साहित्यावर कस्टम ड्युटी भरली किंवा नाही याचीही तपासणी होणार आहे. त्याच्या स्थावर जंगम मालमत्तांमधील तरतूद, गुंतवणूक तसेच अन्य आर्थिक व्यवहार बघता ही अचंबित करणारी श्रीमंती आता बाहेर पडत आहे. हा आकडा मोठा असल्याने ईडीला कागदपत्रे देण्यात येणार आहेत.
खरातचा पिस्तुल परवाना रद्द; काडतुसांबाबत तपास तीव्र
भोंदू बाबा अशोक खरात याचा पिस्तुल परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. या शस्त्राचा गैरवापर झाला आहे का, याबाबत शंका उपस्थित झाल्याने प्रशासनाने त्याचा पिस्तुल परवाना रद्द केला आहे.