कोल्ह्याची शिंगे, कस्तुरी...; भोंदूबाबा खरात करायचा ‘अघोरी’ उपाय; केबल टेस्टरने अल्पवयीन मुलीवर...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 07:04 IST2026-03-21T07:03:01+5:302026-03-21T07:04:19+5:30
वापरायचा प्राण्यांचे अवयव : कोल्ह्याची शिंगे, कस्तुरी वगैरे सांगून करायचा दिशाभूल; अंनिसकडून गुन्हा नोंदवण्याची मागणी; अंगारे-धुपारे, मंतरलेल्या पुड्या देत सामान्यांची करायचा लूट; उपचार केल्याचा व्हिडीओ समोर

कोल्ह्याची शिंगे, कस्तुरी...; भोंदूबाबा खरात करायचा ‘अघोरी’ उपाय; केबल टेस्टरने अल्पवयीन मुलीवर...!
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात हा अघोरी उपायांसाठी कधी कोल्ह्याची शिंगे, अवयव, तर कधी मृगाची कस्तुरी वगैरे वापरल्याचा दावा करत अंगारे -धुपारे, मंतरलेल्या पुड्या देत सामन्यांची दिशाभूल आणि लूट करत असल्याचे पुढे आले आहे. यासंदर्भातील बाबी आणि काही गोपनीय माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एसआयटी अधिकाऱ्यांना दिल्याने या प्रकरणाचे गूढ अधिक गहिरे झाले आहे. त्याआधारे वन्यजीव संरक्षण कायद्यान्वयेही कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
मुलीवर अघोरी उपचार -
इंटरनेट आणि केबल जोडण्याच्या उपकरणांच्या सहाय्याने एका अल्पवयीन मुलीवर केलेल्या अघोरी उपचारांचा व्हिडीओ समोर आल्याचे सांगण्यात येत असून त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, खरात आपल्या कार्यालयात एका महिलेच्या समोर तिच्या अल्पवयीन मुलीला टी-शर्ट वर करण्यास सांगतो. त्या मुलीच्या पोटावर स्पर्श करत अघोरी उपचार करत असल्याचे भासवतो. भोंदूगिरी करण्याचा प्रकारही या निमित्ताने समोर आला आहे.
खरात पीडितांनी चौकशीसाठी पुढे यावे, त्यांची नावे गोपनीय ठेवून संरक्षण देण्यात येईल असे आवाहन पोलिस यंत्रणेने केले आहे. खरात याच्याशी सातत्याने संपर्कात असणाऱ्यांचे कॉल डिटेल्स तपासण्यात येणार आहेत.
खरातचा संबंध बोगस शालार्थ आयडी प्रकरणाशीही जोडला जात आहे. २०२२ साली खरातच्या भावाला तत्कालिन मंत्र्याच्या मध्यस्थीने शालार्थ आयडी काढून देण्यात आल्याचीही चर्चा सिन्नर तालुक्यात रंगली आहे.