सिटीलिंक बसचालक मारहाणप्रकरणी चौघांना बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 01:22 IST2021-11-15T01:21:55+5:302021-11-15T01:22:45+5:30
रस्त्यालगत उभी केलेली मोटार बाजूला घ्या असे सांगितल्यामुळे राग धरुन कुरापत काढत मनपाच्या सिटीलिंक बसमध्ये चढून चालक, वाहकाला बेदम मारहाण केल्याची घटना म्हसरुळ पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी संध्याकाळी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केली आहे. मारहाण करणाऱ्या संशयितांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिटीलिंक बसचालक मारहाणप्रकरणी चौघांना बेड्या
पंचवटी : रस्त्यालगत उभी केलेली मोटार बाजूला घ्या असे सांगितल्यामुळे राग धरुन कुरापत काढत मनपाच्या सिटीलिंक बसमध्ये चढून चालक, वाहकाला बेदम मारहाण केल्याची घटना म्हसरुळ पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी संध्याकाळी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केली आहे. मारहाण करणाऱ्या संशयितांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हसरुळ शिवारातील बोरगड येथे असलेल्या कंसारा माता चौकात चौघा संशयितांनी सिटीलिंक बसचे (एम.एच१५ जी.व्ही७८७०) गोकुळ संजय काकड याला मारहाण केल्याची घटना घडली होती. नेहमीप्रमाणे सिटीलिंक बसचालक काकड व वाहक अक्षय गवारे असे दोघेजण बोरगडला प्रवासी वाहतूक करण्यासाठी बस घेऊन जात होते. यावेळी कंसारा चौकात बस उभी करावयाची असल्याने रस्त्याच्याकडेला उभी असलेली कार बाजूला घ्या, असे सांगितले असता संशयित आरोपी आदित्य चौधरी, मयुर वाघ, रमेश जाधव, प्रशांत गांगुर्डे ऊर्फ सांबा आदींना राग आल्याने त्यांनी बस रस्त्यात थांबवून बसमध्ये चढून चालक व वाहकांना बेदम मारहाण केली होती या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मारहाणीची घटना घडल्यानंतर सिटीलिंक बस चालक व वाहकांनी या घटनेचा निषेध नोंदविला. म्हसरुळ पोलिस ठाण्यात संशयितांना अटक करावी या मागणीसाठी धाव घेतली होती. या घटनेनंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बसचालक व वाहकाला मारहाण करणाऱ्या चौघा संशयितांना तात्काळ ताब्यात घेत अटक केली. त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.