वनविभागाकडून रॅकेट उद्धवस्त : पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यासह तस्कर टोळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 13:37 IST2020-06-15T13:25:11+5:302020-06-15T13:37:39+5:30
ठाणे येथील संशयित सहा.पोलीस निरिक्षक विश्वास बाळासाहेब चव्हाणके (नेमणूक रबाळे पोलीस ठाणे), व पुणे येथील चतुश्रृंगी पोलीस ठाण्यातील रायटर दिपक गोवर्धन धाबेकर यांच्यासह तस्करीच्या गुन्ह्यात

वनविभागाकडून रॅकेट उद्धवस्त : पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यासह तस्कर टोळीचा पर्दाफाश
नाशिक : गुप्तधन प्राप्ती हवी असेल तर मांडूळ आणि घरात पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर कासवाची पूजाविधी करा, या पसरलेल्या अंधश्रध्देमुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात येत आहे. वन्यजीवांच्या तस्करीचे मोठे रॅकेट नाशिक पुर्व वनविभागाच्या येवला रेंज आणि फिरते दक्षता पथकाने उदध्वस्त केले. नाशिक, ठाणे, अहमदनगर,पुणे जिल्ह्यातून एक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यासह १७ तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश केला. या टोळीकडून एक मांडूळ व एक मऊ पाठीचे कासव आणि गुन्ह्यात वापरलेल्या महागड्या चारचाकी, दुचाकी वाहने जप्त करऱ्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी सोमवारी (दि.१५) दिली.
नाशिक जिल्ह्यातील येवला वनपरिक्षेत्रांतर्गत सत्यगाव या खेडेगावात घरामध्ये मांडूळ दडवून ठेवल्याची गोपनीय बातमी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांना मिळाली. त्या माहितीच्याअधारे त्यांनी वनपाल, वनरक्षकांच्या पथकासह संबंधिताच्या घरावर छापा मारून मांडूळसह संशयित आरोपी सोमनाथ रामनाथ पवार (२२) यास ताब्यात घेतले. न्यायालयाकडून त्याची वनकोठडी मिळविल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली असता वनविभागाच्या पथकाला महत्त्वाचे धागेदोरे हाती आले आणि गुन्ह्याची तीव्रता व व्याप्ती मोठी असल्याची खात्री पटली. सहायक वनसंरक्षक सुजीत नेवसे यांनी याप्रकरणी पथकाला मार्गदर्शन करत या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाऊन तस्करांची टोळी गजाआड करण्याचा ह्यटास्कह्ण दिला. त्यानुसार भंडारी, दक्षता पथकाचे वनक्षेत्रपाल बशीर शेख यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र पथके कार्यान्वित करण्यात आली. मिळालेले धागेदोरे तपासत पथकांनी सापळे रचण्यास सुरूवात केली. वडाळीभोई येथून सोमनाथचे नातेवाईक प्रकाश बर्डे, संदीप बर्डे यांना अटक केली. यांच्या सांगण्यावरून सोमनाथने मांडूळचा शोध घेत तो पकडला होता. या मांडूळाची विक्री देवळाली कॅम्प भागातील अंबादास बापु कुवर व थेरगावातील धर्मा देवराम जाधव यांना मांडूळ खरेदी करावयाचा असल्याने पथकाने त्यांनाही संशयावरून ताब्यात घेतले. या दोघांची वनविभागाच्या पथकाने कसून चौकशी केली असता त्यांनी सिन्नर तालुक्यातील म-हळ गावातील संशयित संतोष बाळकिसन कचोळे व मनेगावाती किरण पांडुरंग सोनवणे यांची नावे सांगितली.पथकाने त्यांनाही ४ जून रोजी अटक केली. येवला न्यायालयाकडून त्यांची वनकोठडी घेतल्यानंतर तपासी पथकाकडून त्यांची कसून चौकशी केली गेली आणि धक्कादायक माहिती समोर आली.