देवळ्यात पाच कंदिलांना ट्रकची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 00:31 IST2019-12-12T23:36:09+5:302019-12-13T00:31:54+5:30
देवळा शहरातील नगरपंचायती समोरील चौकातील ऐतिहासिक पाच कंदिलाला वाहनाने धडक दिल्यामुळे बॅरिकेड्सचे नुकसान झाले. सुदैवाने मोठी हानी टळली. यामुळे या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

देवळ्यात पाच कंदिलांना ट्रकची धडक
देवळा : शहरातील नगरपंचायती समोरील चौकातील ऐतिहासिक पाच कंदिलाला वाहनाने धडक दिल्यामुळे बॅरिकेड्सचे नुकसान झाले. सुदैवाने मोठी हानी टळली. यामुळे या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गुरुवारी (दि.१२) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विंचूर-प्रकाशा मार्गावरून सटाण्याकडे जाणारा मालट्रकने ( क्र . एमएच १२, सीटी ८६०९) चौकातील पाच कंदिलाला धडक दिली. यामुळे बॅरिकेड्सचे नुकसान झाले. देवळा शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाच कंदील चौकातून राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पाच कंदील चौकात वाहतुकीची नेहमीच कोंडी होते. देवळा शहर हे विंचूर-प्रकाशा व धुळे-सापुतारा महामार्गावरील मध्यवर्ती शहर आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.
स्वातंत्र्याची आठवण
पाच कंदील चौकाचा इतिहास मोठा रंजक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याची आठवण म्हणून त्यादिवशीच मध्यरात्री देवळा शहरातील नागरिकांनी चौकात स्तंभाची उभारणी केली व ध्वजारोहण करून तेथे पाच कंदील लावले. हाच चौक पुढे पाच कंदील म्हणून प्रसिद्ध झाला. आताही येथेच स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताकदिनाला ध्वजारोहण केले जाते.