दिंडोरीतील भीषण अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर; गिरीश महाजन यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 12:56 IST2026-04-04T12:56:17+5:302026-04-04T12:56:29+5:30
Dindori Accident News: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शुक्रवारी रात्री अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. स्नेहसंमेलन आटोपून घरी परतणाऱ्या इंदोरे येथील दरगोडे कुटुंबाची कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत सहा विद्यार्थ्यांसह एकूण नऊ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

दिंडोरीतील भीषण अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर; गिरीश महाजन यांची घोषणा
- भगवान गायकवाड
नाशिक - नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शुक्रवारी रात्री अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. स्नेहसंमेलन आटोपून घरी परतणाऱ्या इंदोरे येथील दरगोडे कुटुंबाची कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत सहा विद्यार्थ्यांसह एकूण नऊ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आज सकाळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार रामदास चारोस्कर, धनराज महाले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, प्रांत अधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत सांत्वन केले.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. शिवाजीनगर परिसरातील रस्त्यालगत असलेल्या या धोकादायक विहिरीसंदर्भात पर्यायी उपाययोजना का करण्यात आली नाही, याची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विहीर मालक राजेंद्र राजे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला संबंधित विहीर तातडीने बुजविण्यात येणार असून जिल्ह्यात अशा धोकादायक विहिरींचा सर्वे करून आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, दुपारी शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. इंदोरे गावात शोककळा पसरली असून अत्यंत शोकाकुल वातावरणात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी तालुका हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे : सुनील दत्तात्रेय दरगोडे (वय ३२) यांच्यासह त्यांच्या पत्नी रेशमा सुनील दरगोडे (२७), मुलगी राखी उर्फ गुणवंती (१०) आणि दोन पुतण्या माधुरी अनिल दरगोडे (१३) व श्रावणी अनिल दरगोडे (११) यांचा समावेश आहे. तसेच आशा अनिल दरगोडे (३२) यांच्यासह त्यांचा मुलगा श्रेयश अनिल दरगोडे (११), मुलगी श्रुष्टी अनिल दरगोडे (१४) आणि पुतणी समृद्धी राजेश दरगोडे (७) यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.