नाशिकरोडला रेल्वेने सव्वा लाख भाविक
By Admin | Updated: September 12, 2015 23:51 IST2015-09-12T23:50:49+5:302015-09-12T23:51:38+5:30
स्थानक गजबजले : दसक घाट बंदच

नाशिकरोडला रेल्वेने सव्वा लाख भाविक
नाशिकरोड : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दुसऱ्या महत्त्वाच्या पर्वणीच्या शाहीस्नानासाठी दोन दिवसांत रेल्वेमार्गे जवळपास सव्वा लाख भाविक शहरात दाखल झाले आहेत. विविध ठिकाणांहून आलेल्या मुंबईला जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर येत असून, सिन्नर फाटा बाजूने भाविकांना पंचवटी, तपोवन, त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर दसक घाटावर भाविकांना न सोडण्याचा निर्णय शहर पोलिसांनी घेतला आहे.
अमावास्येच्या दिवशी असलेल्या दुसऱ्या पर्वणीचे भाविकांमध्ये मोठे महत्त्व असून, या पर्वणीला शाहीस्नान करण्यासाठी गेल्या आठवड्याभरापासून रेल्वेने हजारो भाविक शहरात दाखल झाले आहेत. गुरुवारी मध्यरात्रीपासून शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत शाहीस्नानासाठी जवळपास सव्वा लाख भाविक शहरात दाखल झाले आहेत. रात्रीपासून सकाळपर्यंत लांब पल्ल्याच्या १०-१२ रेल्वे नाशिकरोडहून मुंबईला जातात. त्यामुळे आणखी हजारो भाविक दाखल होण्याचा रेल्वे प्रशासन व पोलिसांचा अंदाज आहे.
दसक घाट बंदच
शहर पोलिसांनी दुसऱ्या पर्वणीच्या दिवशी पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत भाविकांना दसक घाटावरच स्नानासाठी सोडण्याचा घेतलेला निर्णय रद्द केला आहे. दोन-तीन दिवस झालेल्या पावसामुळे व आगरटाकळी येथील मलशुद्धीकरण केंद्रात खासगी ठेकेदारांच्या कामगारांनी केलेल्या आंदोलनामुळे दूषित व सांडपाणी मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीपात्रात मिसळले आहे. तसेच रेल्वेमार्गे येणाऱ्या भाविकांना सिन्नर फाटा येथून बसने काठे गल्ली सिग्नल त्रिकोणी गार्डन व पुणे बाजूकडून रस्तामार्गे येणाऱ्या भाविकांना चिंचोली नाका बाह्य बसस्थानक येथून बसने डीजीपीनगर, इंदिरानगरमार्गे मुंबई नाका महामार्ग बसस्थानक येथे सोडण्यात येणार आहे. त्यामुळे जेलरोड दसक घाटावर स्नानासाठी भाविकांना सोडण्यात येणार नसल्याचे सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)