मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पित्याचा संशयितावर गोळीबार

By Admin | Updated: August 18, 2016 00:22 IST2016-08-18T00:18:32+5:302016-08-18T00:22:09+5:30

जखमीवर उपचार : बाल न्यायमंडळ आवारातील थरार; संशयित फरार

Firing on father's suspicion | मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पित्याचा संशयितावर गोळीबार

मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पित्याचा संशयितावर गोळीबार

नाशिक : मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बापाने संशयितावर गोळीबार केल्याची घटना बुधवारी (दि़ १७) दुपारी १ वाजेच्या सुमारास उंटवाडीतील बाल न्यायमंडळाच्या आवारात घडली़ या घटनेत जखमी झालेल्या खुनातील संशयित विधिसंघर्षित बालकावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़ या प्रकरणी संशयित प्रलिन श्यामकांत बाविस्कर (रा़ मालेगाव) विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, बाल न्यायमंडळाबाहेर गोळीबार होण्याची शहरातील ही पहिलीच घटना असून तेथील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे़
मालेगाव येथील व्यावसायिक प्रलिन श्यामकांत बाविस्कर यांचा मुलगा मोहितेश (१७, रा़ गोळे कॉलनी, वसतिगृह, नाशिक) हा शिक्षणासाठी नाशिकमध्ये होता़ १४ आॅक्टोबर २०१५ रोजी त्याचा मालेगावमधील दहावीपर्यंतचा वर्गमित्र व नाशिकमध्ये ओळख झालेला ठाणे जिल्ह्णातील जव्हार येथील दुसरा मित्र संशयित आकाश प्रभू (१८) हे दोघे त्यास फिरण्याच्या नावाखाली बुलेटवर बसवून त्र्यंबकेश्वरला घेऊन गेले़ या ठिकाणी २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी या दोघांनी दगडाने ठेचून मोहितचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले़
या खून प्रकरणात मोहितेश बाविस्करचा वर्गमित्र व संशयित हा विधिसंघर्षित असल्याने न्यायालयाने त्याची रवानगी किशोर सुधारालयात, तर दुसरा संशयित आकाश प्रभू यास पोलीस कोठडी सुनावली होती़ उंटवाडीतील बाल न्यायमंडळाच्या न्यायाधीश अंजली कोळपकर यांच्याकडे या खटल्याची सुनावणी सुरू असून बुधवारी तारीख असल्याने या संशयितास बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले होते़ दुपारी एक वाजेच्या सुमारास सुनावणीनंतर संशयित न्यायालय आवारात आला असता संशयित प्रलिन बाविस्कर याने गोळीबार केला़
यामध्ये बंदुकीची गोळी संशयित विधिसंघर्षित बालकाच्या डाव्या हाताला चाटून छातीमध्ये घुसल्याने त्यास उपचारासाठी त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ या ठिकाणी आॅपरेशन करून विधिसंघर्षित बालकाच्या शरीरातून बंदुकीची गोळी बाहेर काढण्यात आली़ तर गोळीबाराच्या घटनेनंतर संशयित बाविस्कर फरार झाले़ या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते़ दरम्यान जखमी विधिसंघर्षित बालकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

गतवर्षी आॅक्टोबरमध्ये २० लाख रुपयांच्या खंडणीतून मोहितेश बाविस्कर या युवकाचा दोघांनी खून केल्याची घटना घडली होती़ बाल न्यायमंडळात सुरू असलेल्या या खटल्याच्या सुनावणीसाठी संशयित विधिसंघर्षित बालकास आणले होते़ सुनावणीनंतर तो खाली उतरत असताना संशयित प्रलिन बाविस्कर यांनी त्याच्यावर गोळीबार केला़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
- लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपआयुक्त, नाशिक़

Web Title: Firing on father's suspicion