दीड तासानंतर आग आटोक्यात : वडाळागावात तीन घरे भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 14:09 IST2019-02-09T14:06:34+5:302019-02-09T14:09:07+5:30
तीन घरांपैकी पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या मुख्तार शेख यांचे घर संपुर्णत: जळून खाक झाले. त्यांच्या घरातील संसारपयोगीवस्त बेचिराख झाल्याने कुटुंबातील महिलांनी एकच टाहो फोडला होता

दीड तासानंतर आग आटोक्यात : वडाळागावात तीन घरे भस्मसात
नाशिक : वडाळागाव परिसरातील सादिकनगर झोपडपट्टीमध्ये दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एका बंद घरामध्ये अचानकपणे आग लागल्याने दाट लोकवस्तीच्या या परिसरात तीन घरे आगीने आपल्या कवेत घेतली होती. आगीच्या विळख्यात सापडलेल्या या तीन घरांपैकी पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या मुख्तार शेख यांचे घर संपुर्णत: जळून खाक झाले. त्यांच्या घरातील संसारपयोगीवस्त बेचिराख झाल्याने कुटुंबातील महिलांनी एकच टाहो फोडला होता. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीवर दीड तासांत नियंत्रण मिळविण्यास जवानांना यश आले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, श्री.श्री.रविशंकर मार्ग या शंभरफूटी रिंगरोडला लागून असलेल्या सादिकनगर, महेबुबनगर, साठेनगर, गुलशननगर ही दाट लोकवस्ती आहे. या भागात रहिवाशांसह व्यावसायिकांची गुदामे, म्हशींचे गोठे आहेत. सादिकनगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ अचाकपणे एका पत्र्याच्या घरातून धुराचे लोट उठत असल्याचे नागरिकांनी शनिवारी (दि.९) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दिसले. यावेळी परिसरातील युवकांनी धाव घेतली असता मुख्तार यांचे संपुर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे लक्षात आले. यावेळी सुदैवाने घराला कुलूप होते. त्यामुळे जीवीतहानीचा धोका टळला; मात्र घरातील सर्व संसारपयोगी वस्तू भस्मसात झाल्या. घटनेची माहिती अग्निशमन मुख्यालय व पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली. त्यानंतर तत्काळ घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन दलाचे एकूण तीन बंब दाखल झाले. पोलिसांनी आगीवर बघ्यांची गर्दी नियंत्रणात आणली तर जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.