मास्क न वापरल्यास हजार रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 01:08 AM2021-02-22T01:08:53+5:302021-02-22T01:10:35+5:30

लग्न समारंभात होणारी गर्दी आणि मास्क वापरण्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता नाशिककरांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.  विनामास्क फिरणाऱ्यांना  एक हजार रुपये दंड  आकारला जाणार असून प्रसंगी गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो. 

A fine of Rs | मास्क न वापरल्यास हजार रुपयांचा दंड

कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक रत्ना रावखंडे आदी. 

Next
ठळक मुद्देकोरोना रोखण्यासाठी उपाययोजना निष्काळजीपणा करणाऱ्यांवर  कारवाई होणार

नाशिक : लग्न समारंभात होणारी गर्दी आणि मास्क वापरण्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता नाशिककरांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.  विनामास्क फिरणाऱ्यांना  एक हजार रुपये दंड  आकारला जाणार असून प्रसंगी गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो. 
पालकमंत्री छगन भुजबवळ यांनी रविवारी दुपारी भुजबळ फार्म येथे कोरेाना आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे सांगितले. विनामास्क फिरल्यास दंडात्मक कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या.
गेल्या ६ फेब्रुवारी रोजी रुग्ण संख्या अवघी १११ इतकी होती. दि. ७ फेब्रुवारीनंतर त्यात वाढ होत गेली आणि २१ फेब्रुवारीपर्यंत रुग्णसंख्या १७३१ पर्यंत पोहचली.  मागील पाच दिवसात तर रुग्णसंख्या वाढीचा वेग अधिक असल्याचेदेखील समोर आल्याने काही निर्णय घ्यावे लागले असल्याचे भुजबळ म्हणाले. 
लग्न सोहळ्यांना होणाऱ्या गर्दीत असंख्य लोक विनामास्क फिरत असतात. कोरोनाचे भय बाजूला सारुन बाजारपेठेतही विनामास्क फिरणाऱ्यांनी गर्दी दिसते. मास्ककडे झालेले दुलर्लक्ष आणि त्यामुळेच रुग्न संख्या वाढत असल्याने नाशिककरांना आता मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. विनामास्क आढळल्यास महापालिका तसेच पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
याबैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्याधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत खैरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, डॉ. अनंत पवार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत आदी उपस्थित होते.
केवळ १०० व्यक्तींनाच परवानगी
लग्न सोहळ्यातील गर्दी टाळण्यासाठी येथून पुढे केवळ १०० व्यक्तींनाच परवानगी दिली जाणार आहे. ज्यांचा लग्नसोहळा आहे त्यांना याबाबत पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. गोरजमुहुर्तावर लग्नसमारंभात होणाऱ्या गर्दीचे प्रमाण लक्षात घेऊन मंडप व लॉन्स मालकांनादेखील याबाबतची समज दिली जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी काढली अधिसूचना
पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले. त्यानुसार जिल्ह्यामध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणी, सर्व आस्थापना, समारंभ, कार्यक्रम या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक राहील. मास्कचा वापर न केल्यास हजार रुपये दंड आणि प्रचलित नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
गोरज मुहूर्तावरील लग्नांवर येणार निर्बंध
गोरज मुहूर्तावर होणाऱ्या लग्न सोहळ्याला मोठी गर्दी होत असते. त्यामुळे अशा मुहूर्तावर होणाऱ्या लग्न सोहळ्यांवर आता पोलिसांची नजर राहाणार आहे.  शक्यतो दुपारी लग्न आणि सायंकाळी स्वागत समारंभ असा कार्यक्रम मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत करण्याचा सल्लादेखील भुजबळ यांनी नाशिककरांना दिला. लग्न सोहळ्यासाठी यापुढे केवळ शंभर जणांनाच परवानगी दिली जाणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Web Title: A fine of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.