महिला कार्यकर्त्या लागल्या कामाला

By Admin | Updated: September 29, 2014 00:53 IST2014-09-29T00:52:56+5:302014-09-29T00:53:13+5:30

प्रचार यंत्रणा : उमेदवारांकडून प्रचाराची होतेय घाई

Female workers have been engaged | महिला कार्यकर्त्या लागल्या कामाला

महिला कार्यकर्त्या लागल्या कामाला

नाशिक : उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली असून, उमेदवाराच्या प्रचारासाठी महिला पत्रके वाटताना दिसून येत आहेत. अद्याप अर्ज छाननी आणि माघारी झालेली नसली, तरी ज्यांनी निवडणूक आखाडा लढविण्याचा चंग बांधला आहे त्यांनी प्रचार यंत्रणा सुरू केली आहे.
प्रचारासाठी उमेवाराप्रमाणेच कार्यकर्ते प्रचारासाठी उत्सुक असतात. त्यामध्ये महिलांचीदेखील आघाडी असून, कुटुंबातील महिला प्रचारात अग्रेसर असल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळते. आताही हे चित्र वेगळे नाही. कालच उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अनेक उमेदवारांच्या महिला कार्यकर्त्यांनी लागलीच पत्रके वाटपास सुरुवात केल्याचे चित्र आहे. कुटुंबातील महिला आपल्या परिचयातील इतर महिला, पक्षाच्या कार्यकर्त्या आणि नातेवाइकांना घेऊन प्रचारास सहभागी होत असतात. प्रचाराला रंगत चढेल तसा महिलांचाही सहभाग वाढणार आहे. आता कुठे सुरुवात झाली असून, चारही मतदारसंघांत महिलांकडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आहे.
हातात प्रचारपत्रके, डोक्यावर पक्षाची कॅप, गळ्यात पक्षाची मफलर घेतलेल्या महिला कार्यकर्त्या शहरात फिरताना दिसत आहेत. दहा ते पंधरा महिला कार्यकर्त्या कॉलनी, सोसायटी परिसरात फिरत आहेत. प्रचाराला रंगत चढेल त्याप्रमाणे महिला कार्यकर्त्यांचीदेखील संख्या वाढण्याची शक्यता आहे. सध्या उमेदवाराच्या कुटुंबातील महिलांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Female workers have been engaged