माजी मंत्री भारती पवार यांच्या दारात लेकीला सोडून बाप फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:39 IST2025-05-08T17:39:18+5:302025-05-08T17:39:42+5:30
नाशिक पोलिसांनी मायलेकीची घडविली भेट

माजी मंत्री भारती पवार यांच्या दारात लेकीला सोडून बाप फरार
नाशिक : माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या दारात एका पित्याने मंगळवारी (दि. ६) सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास एक वर्षाच्या बालिकेला बेवारसपणे सोडून पलायन केल्याची घटना घडली होती. ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा गंगापूर पोलिसांना माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत बालिकेला ताब्यात घेत तपास सुरू केला असता सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास चिमुकलीच्या मातेचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले.
गंगापूररोड भागात भारती पवार यांचे निवासस्थान आहे. सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानाबाहेर दुचाकीने रोशनी नावाच्या लहानग्या लेकीला घेऊन दाखल झाला. त्याने दुचाकीवरून उतरल्यानंतर बालिकेला बंगल्यात घेऊन जात त्यांच्या दारावर सोडून दिले. यानंतर दुचाकीने धूम ठोकली. काही वेळेनंतर ही बाब जेव्हा पवार यांच्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची तपासणी यावेळी करण्यात आली असता दाढी वाढलेला व पांढरा टी-शर्ट अंगात परिधान केलेला ४०-४५ वयोगटातील मजबूत बांधा असलेला इसम बालिकेला दारावर सोडून पळ काढला.
...असा घेतला लेकीच्या आईचा शोध
मुलीचे व त्या इसमाचे फोटो काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल करत त्यावरून त्या इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली. दुपारी चार वाजेनंतर पोलिसांना यश येऊ लागले. साक्री तालुक्यातील एका गावातील कुटुंब असल्याचे निष्पन्न झाले.
तेथे काही लोकांनी फुटेजमधील इसमाला ओळखले. हा इसम येथील एका कंपनीत कामगार असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी कंपनी गाठून त्या इसमाचा पत्ता काढला असता मुळ पत्ता साक्रीच्या चिचपाडा गावातील मिळाला. तेथील नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क साधला. त्यावेळी ही माहिती मिळाली.