वेळ दिल्यास वाढेल कौटुंबिक सुसंवाद

By Admin | Updated: July 30, 2014 00:23 IST2014-07-29T23:09:08+5:302014-07-30T00:23:01+5:30

पालक दिन : ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ चर्चासत्रातील सूर

Family interaction will increase if given time | वेळ दिल्यास वाढेल कौटुंबिक सुसंवाद

वेळ दिल्यास वाढेल कौटुंबिक सुसंवाद

नाशिक : पालक व मुलांनी एकमेकांच्या भावनांना समजून घेण्यासाठी जाणीवपूर्वक वेळ देणे आवश्यक असून, यामुळे कौटुंबिक सुसंवाद उत्तरोत्तर विकसित होण्यास मदत होईल, असा सूर पालक-मुलांच्या खुल्या चर्चासत्रामधून उमटला.
निमित्त होते, जैन सोशल ग्रुपच्या वतीने गंगापूररोड येथील शंकराचार्य सभागृहात आयोजित ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या अनोख्या खुल्या चर्चासत्राचे. यावेळी मुलांनी व पालकांनी मनमोकळेपणाने चर्चा केली. दरम्यान, मुलांनीदेखील पालकांविषयीचे विविध कमकुवत पैलू मांडले, तसेच पालकांनीदेखील मुलांच्या वाढत्या काही अमर्याद सवयींकडे लक्ष वेधले. यावेळी पालकांकडून फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंगचा वाढता वापर, फास्ट फूडवर वाढते प्रेम, फॅशनचा मोह, फन लव्हिंग नेचर अशा गोष्टींकडे मुले वाहवत चालल्याचे सागंण्यात आले, तर मुलांनी पालकांकडून संभाषणाकडे केले जाणारे दुर्लक्ष, इतर मुलांसोबत केली जाणारी तुलना, आत्मविश्वास विकसित करण्याकडे केले जाणारे दुर्लक्ष आदि बाबींविषयीची खंत व्यक्त
केली. गीता परिवाराचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी पालक-मुलांमधील चर्चेवर विस्तृतपणे मत मांडले. यावेळी मालपाणी म्हणाले, पालकांनी मुलांसाठी व मुलांनी पालकांसाठी जाणीवपूर्वक वेळ देणे गरजेचे आहे. मुलांनी आपल्या सोशल नेटवर्किंगच्या वापरावर तसेच फास्ट फूडच्या मोहावर मर्यादा घालणे गरजेचे आहे. पालकांनी ममत्वाबरोबर समत्व साधण्याचा प्रयत्न केल्यास कौटुंबिक संवाद अधिक विकसित होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी अध्यक्ष सचिन गांग, हर्षवर्धन गांधी, अजय ब्रह्मेचा, प्रणय संचेती आदि व्यासपीठावर उपस्थित होते. प्रफुल्ल बरडिया, प्राजक्त मेहता यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Family interaction will increase if given time