कालिकानगर रस्त्याची दुरवस्था; नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 00:54 IST2018-11-06T00:54:39+5:302018-11-06T00:54:58+5:30
हिरावाडीतील त्रिकोणी बंगल्यानजीक असलेल्या कालिकानगर रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झालेली असली तरी याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कालिकानगर रस्त्याची दुरवस्था; नागरिक त्रस्त
पंचवटी : हिरावाडीतील त्रिकोणी बंगल्यानजीक असलेल्या कालिकानगर रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झालेली असली तरी याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे प्रभागाच्या लोकप्रतिनिधींनी वारंवार मनपाकडे पाठपुरावा करूनही रस्त्याच्या डांबरीकरण कामाला सुरुवात झालेली नसल्याने रस्त्याचे डांबरीकरण कधी? असा सवाल केला जात आहे. त्रिकोणी बंगला ते कालिकानगर अवघे शंभर ते दीडशे मीटर अंतर आहे. कालिकानगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण काम झालेले असले तरी अद्याप डांबरीकरण कामाला सुरुवात केलेली नाही. गेल्या अनेक वर्षापासून खडीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर वेळीच डांबरीकरण करणे गरजेचे होते, मात्र मनपा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना अडथळ्याची शर्यत पार पाडावी लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे.
डांबरीकरण रखडले
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण काम झालेले नसल्याने ते पूर्ण करावे यासाठी प्रभागाच्या लोकप्रतिनिधींनी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. मात्र तरीदेखील डांबरीकरण कामाला मुहूर्त लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.