गटारीच्या समस्येने नागरिक हैराण
By Admin | Updated: October 24, 2016 00:36 IST2016-10-24T00:36:14+5:302016-10-24T00:36:44+5:30
रेणुकानगर : पालिकेकडे तक्रार करूनही कार्यवाहीस नकार

गटारीच्या समस्येने नागरिक हैराण
नाशिक : एकीकडे महापालिका अस्वच्छतेसाठी अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांना नोटिसा बजावत असताना दुसरीकडे मात्र अस्वच्छतेविषयी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रेणुकानगर येथे गटारी तुंबून मैलयुक्त पाणी रस्त्यावर आले असतानाही पालिकडेकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.
गेल्या दोन महिन्यांत शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या विक्रमी वाढल्याने पालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाल्याचा दावा केला जात आहे. सणासुदीची रात्र स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. इतकेच नव्हे तर डासनिर्मितीस प्रेरक वातावरण करणाऱ्या नागरिकांना नोटिसा दिल्या जात आहेत. परंतु दुसरीकडे अस्वच्छतेविषयी तक्रारी केल्यानंतरही कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. रेणुकानगरमध्ये असलेल्या शॉपिंग सेंटर परिसरातील दुकानदार आणि अन्य नागरिकांना हा अनुभव आला आहे. या भागातील गटारी तुंबून पाणी रस्त्यावर आले आहे. रहिवासी भागात घरांसमोरून पाणी वाहत आहे. अस्वच्छतेमुळे डास निर्माण झाले आहे, शिवाय रोगराईचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील अनेक नागरिक आजारी पडले आहेत. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी महापालिकेत अनेकदा तक्रारी केल्या, परंतु उपयोग झाला नाही. घाण पाण्यामुळे दुर्गंधी आणि डास वाढल्याने नागरिकांना या परिसरात वास्तव्य करणे कठीण झाले आहे. महापालिकेच्या विभागीय कार्यालयात आरोग्य विभागात आणि त्यानंतर स्थानिक नगरसेवकाच्या कार्यालयात जाऊन तक्रार करूनही कोणीही दखल घेण्यास तयार नसल्याने नागरिक संतप्त झाले असून, आता मैलयुक्त पाणी पालिकेच्या कार्यालयात नेण्याची तयारी सुरू झाली आहे.