नाशिक : अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजांप्रमाणेच विचार आणि भावना व्यक्त करणे ही मानवी प्रवृत्ती असून, वाचनामुळेच सद्विचारांची प्रेरणा मिळून सद्भावना वाढीस लागते. यासाठी वाचनाची आवड असलेल्या अनेक गरजू लोकांपर्यंत तसेच अनाथालयातील मुलांपर्यंत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहचविण्यासाठी ‘पुस्तके दान करा’ असा डोनेट युवर बुक्स डॉट इन संकेतस्थळाचा उपक्रम नाशिकमधील सॉफ्टवेअर अभियंता ओंकार गंधे आणि त्याच्या सहकारी मित्रांनी हाती घेतला असून, या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपल्या घरातील जुनी होतात, मग ती कुणी वाचत नाही, अशी पुस्तके रद्दीत देण्याऐवजी वाचनाची आवड असलेल्या गरजू लोकांपर्यंत पोहचवावी, असे अनेकांना वाटते. या विचारातूनच ओंकार गंधे यांनी आपल्या मित्रांच्या सहकाऱ्याने ‘डोनेट युवर बुक्स डॉट इन’ ही वेबसाइट सुरू केली आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून गरजूंना पुस्तके दान करता येतात. शाळा, कॉलेजमधील पुस्तकांचादेखील समावेश करता येतो. या वेबसाइटवर जाऊन फक्त माहिती भरायची आणि आपल्या पुस्तके दान करायची की मागायची याबाबत हे कळवावे लागते. त्यानुसार तुम्हाला पुस्तक दान करायचे असेल तर वेबसाइटवर माहिती भरल्यानंतर त्या पुस्तकांची मागणी केली असेल त्यांच्यापर्यंत ही पुस्तके पोहोचविली जातात. त्यामध्ये डोनेट युवर बुक्स डॉट इन हे एक मध्यस्थासारखे कार्य करते. या आवाहनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून पुणे, नगर, संगमनेर अशा विविध शहरांमधून तसेच ग्रामीण भागांमधून विविध प्रकारची पुस्तके जमा झाली आहेत. तसेच आदिवासी भागातील मुलांपर्यंत तसेच खेड्यापाड्यांतील ज्या मुलांना आणि सर्वसामान्य नागरिक महिला, युवक-युवती तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्यामार्फत सदर पुस्तके पोहोचविण्यात येतात. त्याचप्रमाणे अनेक गरीब विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजची पुस्तके विकत घेणे परवडत नाही. त्यांनादेखील श्रीमंत विद्यार्थ्यांकडून मिळालेली पुस्तके पुरविण्याचे कार्य या माध्यमातून करण्यात येत असल्याचे गंधे यांनी सांगितले.स्वखर्चातून उभारले फिरते ग्रंथालयअनेक वाचकांना पुस्तक वाचनाची आवड असते, परंतु ते पुस्तके विकत घेऊ शकत नाहीत. अशा पुस्तक वाचकप्रेमींसाठी ओंकार गंधे यांनी दर महिन्याला आपल्या नोकरीतून विशिष्ट रक्कम खर्च करून पुस्तके खरेदी केली असून, ती गरजूंपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वाचनासाठी पोहचविली जातात.
गरजू मुलांसाठी पुस्तकांचे दान ; उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:29 IST