कस्तुरीसाठी हरणाची हत्या, नरबळीचाही संशय; भोंदूबाबा अशोक खरातचे 'प्रताप'; सरकारी वकिलांनी कोर्टात पाढाच वाचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 16:43 IST2026-03-24T16:42:37+5:302026-03-24T16:43:00+5:30
Ashok Kharat: अशोक खरात या भोंदूला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासातून जी माहिती मिळाली, ती न्यायालयाला सांगितली.

कस्तुरीसाठी हरणाची हत्या, नरबळीचाही संशय; भोंदूबाबा अशोक खरातचे 'प्रताप'; सरकारी वकिलांनी कोर्टात पाढाच वाचला
'अशोक खरात हा महिलांना पाणी प्यायला द्यायचा. महिलांना जाळ्यात ओढायचा. तो स्वतः सिद्ध पुरुष असल्याचे सांगून महिलांवर अत्याचार करत होता. त्याने पाच नरबळी दिल्याचा संशय आहे. त्याच्या फार्महाऊसवर गोळीबार करण्यात आलेली रिकामी काडतुसे मिळाली आहेत. ती त्याने कुठे वापरली याचाही तपास करायचा आहे', अशी धक्कादायक माहिती नाशिक पोलिसांनी न्यायालयात दिली. अशोक खरात याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी त्याने केलेले प्रताप न्यायालयात सांगितले. दरम्यान, न्यायालयाने सुनावणीअंती खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, अशोक खरात हा स्वतःला सिद्धपुरुष सांगून महिलांची फसवणूक करत होता. खरात याच्या काही प्रमाणपत्रे मिळाली आहेत. त्याचा आम्ही अभ्यास करत आहोत.
अशोक खरातच्या घरात काय काय सापडले?
अशोक खरातच्या घरात ६ लाख ५३ हजार इतकी रोख रक्कम, लॅपटॉप, काळ्या रंगाची रिव्हॉल्व्हर आणि राजमुद्रा, ३१ काडतुसे अशा वस्तू सापडल्या आहेत, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
मधामध्ये गुंगीचे पदार्थ मिसळून अशोक खरात महिलांचे शोषण करायचा. महिलांच्या पूजा विधी मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळी असायच्या. हरणाची काळी आणि कस्तुरी, तो कस्तुरी कुठून मिळवायचा, त्याचा शोध घ्यायचा आहे. तो ज्या वस्तू वापरत होता, त्याचा तपास करायचा आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. पोलिसांनी खरातला ७ दिवसांची कोठडीची मागणी केली.
काही पेन ड्रॉईव्ह आणि डिजिटल डेटा एसआयटीच्या हाती लागला आहे. अशोक खरात याने पाच नरबळी दिल्याचा संशय आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर त्याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.