रिसर्च टीम शोधणार 'मालेगाव मॅजिक', चार महाविद्यालयांतील ३५ तज्ज्ञांची टीम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 01:36 PM2022-01-13T13:36:08+5:302022-01-13T13:36:44+5:30

CoronaVirus : एक ना अनेक समस्यांनी घेरलेले मालेगाव कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्य सरकारची झोप उडविणारे ठरले. मात्र, आता हेच संपूर्ण देशभरातील आरोग्य यंत्रणेसाठी कुतूहलाचा विषय ठरले आहे.

CoronaVirus : Research team will search for 'Malegaon Magic', a team of 35 experts from four colleges in Nashik | रिसर्च टीम शोधणार 'मालेगाव मॅजिक', चार महाविद्यालयांतील ३५ तज्ज्ञांची टीम

रिसर्च टीम शोधणार 'मालेगाव मॅजिक', चार महाविद्यालयांतील ३५ तज्ज्ञांची टीम

googlenewsNext

नाशिक : राज्यात सर्वत्र गुणाकार पद्धतीने रुग्णसंख्या वाढत असताना मालेगावात सक्रिय रुग्णांची संख्या अवघी ६५ आहे. त्यामुळे मालेगावच्या कोरोना मुक्तीचे रहस्य नेमके काय हा प्रश्न उपस्थित होत असून, हे गूढ उकलण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ६० समन्वयकांसह सुमारे ३५ तज्ज्ञ संशोधकांचे पथक नियुक्त केले आहे. 

या पथकाची पहिली बैठक मंगळवारी (दि. १२) मालेगावला पार पडली असून, रिसर्च टीममधील तज्ज्ञांकडून मालेगावातील सुमारे अडीच हजार नागरिकांचे रक्ताचे नमुने घेऊन त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्याचे कारण मालेगाव काढा, अर्सेनिक अल्बम व जीवनशैलीचा एकत्रित अभ्यास करणार असल्याचे निश्चित करण्यात आले.

एक ना अनेक समस्यांनी घेरलेले मालेगाव कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्य सरकारची झोप उडविणारे ठरले. मात्र, आता हेच संपूर्ण देशभरातील आरोग्य यंत्रणेसाठी कुतूहलाचा विषय ठरले आहे. राज्यभरात रुग्ण संख्येचे आकडे हजारांनी वाढत असताना मालेगावमध्ये मात्र बोटावर मोजण्याएवढेच रुग्ण आढळत आहेत. 

सरकारी नियमांचे सर्रास उल्लंघन होणाऱ्या मालेगावमध्ये रुग्ण संख्या वाढत नसल्याने सर्वांना आश्चर्य वाटत असून, त्यामुळेच राज्य सरकारच्या सूचनेनुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मालेगावचा अभ्यास करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान लष्करी जवानांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या निवृत्त लेफ्टनंट जनरल तथा कुलगुरू डॉ. माधुरी कानीटकर यांच्या नेतृत्वात हा संशोधनात्मक अभ्यास तयार करून यासंदर्भातील अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. या संशोधन अहवालाकडे कोरोनामुक्तीची आस लावून बसलेल्या संपूर्ण देशातील आरोग्य व्यवस्थेचे लक्ष लागलेले आहे.

चार महाविद्यालयांतील ३५ तज्ज्ञांची टीम
मालेगावमधील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी नाशिकमधील होमिओपॅथी, आयुर्वेद महाविद्यालयांसह मालेगावमधील दोन युनानी व धुळे वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे ३५ तज्ज्ञांची टीम तयार करण्यात आली असून, या टीमच्या माध्यमातून मालेगावममधील अडीच हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले जाणार आहे. तसेच त्यांचा दिनक्रम, खाण्या-पिण्याच्या सवयी, कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेतली जाणार आहे. त्याच्या एकत्रित अभ्यासातून कोरोनाचे प्रमाण घटण्याची कारणे शोधली जाणार असून, या मोहिमेचे मालेगाव मॅजिक असे नामकरण करण्यात आले आहे.

Web Title: CoronaVirus : Research team will search for 'Malegaon Magic', a team of 35 experts from four colleges in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.