लष्करी हद्दीचा नागरी वापर; ५४ एकर जागेची मागणी

By Admin | Updated: January 20, 2017 01:22 IST2017-01-20T01:21:50+5:302017-01-20T01:22:03+5:30

मनपाकडे प्रस्ताव : मुख्य सचिवांकडे बैठक

Civil use of military custody; Demand for 54 acres of land | लष्करी हद्दीचा नागरी वापर; ५४ एकर जागेची मागणी

लष्करी हद्दीचा नागरी वापर; ५४ एकर जागेची मागणी

 नाशिक : देवळाली कॅन्टोन्मेंट या लष्करी हद्दीतील काही रस्त्यांचा नागरी वापर होत असल्याने लष्कराने त्या बदल्यात सुमारे ५४ एकर पर्यायी जागेची मागणी महापालिकेकडे केली आहे. दरम्यान, महापालिकेने याबाबत असमर्थता दर्शविली असली तरी जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत वस्तुस्थिती तपासून पाहूनच निर्णय घेतला जाणार असल्याचे राज्याच्या मुख्य सचिवांकडे स्पष्ट केले आहे.
राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या उपस्थितीत मुंबईत लष्करी अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. यावेळी देवळाली कॅन्टोन्मेंटचे ब्रिगेडियर, अधिकारी तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. देवळाली कॅम्प आर्टिलरी रोड भागातील लॅमरोड ते अनुराधा सिनेमापर्यंतचा रस्ता तसेच कारगिल गेट ते मुंबई-आग्रा महामार्ग दरम्यानच्या रस्त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून नागरी वापर होत आहे. सदर जागा ही लष्कराने संपादित केलेली आहे. परंतु, या रस्त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावरील वाहतुकीसाठी केला जात आहे. त्यात ५१.४२ एकर आणि २.२० एकर जागेचा समावेश आहे. सुमारे ५४ एकर लष्कराच्या जागेचा वापर नागरी सेवेसाठी होत आहे. त्यामुळे या जागेच्या बदल्यात महापालिकेने अन्यत्र ५४ एकर जागा लष्कराला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच ठिकाणी जागा महापालिकेकडे उपलब्ध नसल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. यावेळी मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून विचारणा केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत वस्तुस्थिती तपासून पाहून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Civil use of military custody; Demand for 54 acres of land