बाल येशू यात्रा : अवजड वाहने शनिवारपासून पुणे महामार्गावर धावू शकणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 16:53 IST2019-02-07T16:49:27+5:302019-02-07T16:53:18+5:30
सालाबादप्रमाणे उपनगर येथे बाल येशु मंदिरात दोनदिवसीय यात्रोत्सव शनिवारपासून सुरू होत आहे. या यात्रेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव दाखल होतात.

बाल येशू यात्रा : अवजड वाहने शनिवारपासून पुणे महामार्गावर धावू शकणार नाही
नाशिक : येत्या शनिवारपासून (दि.९) पुणे महामार्गावरील उपनगर येथे दोन दिवसीय बाल येशु यात्रा सुरू होणार आहे. यानिमित्त शहर वाहतूक नियंत्रण विभागाकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून अवजड वाहनांना प्रवेश बंद राहणार असल्याची अधिसूचना उपआुयक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी जाहीर केली आहे.
सालाबादप्रमाणे उपनगर येथे बाल येशु मंदिरात दोनदिवसीय यात्रोत्सव शनिवारपासून सुरू होत आहे. या यात्रेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव दाखल होतात. यामुळे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन कुठलीही दुर्घटना घडू नये, म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. सिन्नरकडून उपनगरमार्गे द्वारकेकडे जाणारी अवजड वाहने बिटको चौकातून डावीकडे वळण घेत पुढे देवळाली गाव, विहितगावमार्गे वडनेरगेट येथून वळण घेत पाथर्डीफाट्यावरून मुबंईकडे रवाना होतील. तसेच द्वारके कडून सिन्नर, पुणेकडे जाणारी अवजड वाहने विजय-ममता फेम सिग्नलवरून डावीकडे वळण घेत रामदास स्वामी मार्गाने थेट औरंगाबादनाका, लाखलगाव टी-पॉइंटवरून नांदूरनाकामार्गे पुढे मार्गस्थ होतील. तसेच पुणे, सिन्नरकडून येणारी अवजड वाहतूक धुळेकडे जाण्यासाठी शिंदेगावातून चांदगिरी, कोटमगाव येथून (उजवीकडे वळण) औरंगाबादरोडने नांदूरनाका, जत्रा चौफूलीवरून पुढे रवाना होतील. या अधिसूचनेचे पालन सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांची वाहतूक करणा-या वाहनचालक-मालकावर बंधनकारक आहे. हे निर्बंध शनिवारी सकाळी सहा ते रविवारी रात्री अकरा वाजेपर्यंत लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.