मुख्यमंत्री घेणार आढावा

By Admin | Updated: September 6, 2016 01:40 IST2016-09-06T01:40:19+5:302016-09-06T01:40:28+5:30

प्रशासनाची धावपळ : बैठकीची रंगीत तालीम

Chief Minister to review | मुख्यमंत्री घेणार आढावा

मुख्यमंत्री घेणार आढावा

 नाशिक : जलयुक्त शिवार ते सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी यासारख्या महसूल विभागाशी निगडित बाबींचा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांकडून गुरुवारी आढावा घेणार असल्यामुळे महसूल खात्याची धावपळ उडाली असून, या बैठकीसाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आल्यामुळे तर या बैठकीची व्याप्ती आणखीच वाढली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विभागनिहाय या बैठकांचे आयोजन केले असून, त्याची सुरुवात नाशिक-औरंगाबादपासून करण्यात येत आहे. गुरुवार, दि. ८ रोजी नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठ सभागृहात नाशिक व औरंगाबाद विभागाची तर ११ सप्टेंबर रोजी नागपूर, १६ रोजी अमरावती, १७ पुणे व १८ रोजी कोकण विभागाच्या बैठका होतील.
नाशिक येथे होणाऱ्या बैठकीत जलयुक्त शिवार योजना, शेततळे व विहीर पुनर्भरण, स्वच्छ भारत योजनेंतर्गत गाव प्रगती, पंतप्रधान आवास योजना व अनुसूचित जाती/जमातीसाठी विशेष घर बांधणे योजनेची प्रगती, सेवा हमी कायद्याची तालुका पातळीवर अंमलबजावणी, इम्युटेशन या विषयाचा आढावा घेणार आहेत.
प्रारंभी असा आढावा विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांकडूनच घेतला जाणार होता, परंतु नंतर त्याची व्याप्ती वाढवून या बैठकीस तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Chief Minister to review