Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, झाली तर आघाडी नाही तर स्वबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 13:06 IST2022-01-11T12:55:41+5:302022-01-11T13:06:19+5:30
आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (दि. १०) घेण्यात आली. ...

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, झाली तर आघाडी नाही तर स्वबळ!
आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (दि. १०) घेण्यात आली. ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने कोर्टात केस दाखल करण्यात आलेली आहे. त्याचा निकाल लवकरच येईल; परंतु निकालाची वाट न पाहता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागावे. नाशिक महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संख्याबळ सध्या जरी कमी असले तरी यंदाच्या वेळेस मात्र आपल्याला ती भरपाई करावी लागणार असून, जास्तीतजास्त उमेदवार निवडून आणावे लागतील. त्यासाठी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी काम करावे.
राज्यात महाविकास आघाडी सरकारला जनतेची पसंती असून, वरिष्ठ पातळीवर सन्मानजनक आघाडी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तरीदेखील सर्व जागांवर लढायची तयारी करण्यात यावी. त्यासाठी शहरात इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपापल्या वॉर्डात निवडणुकीच्या कामाला लागावे. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बदलून त्या ठिकाणी सक्रिय सदस्याला जबाबदारी देण्यात यावी. शहरातील सर्व सहा विभागांत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येऊन जबाबदारीचे वाटप करण्यात यावे, अशा सूचनाही भुजबळ यांनी यावेळी केली. बैठकीस शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी खासदार देवीदास पिंगळे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, निवृत्ती अरिंगळे, अनिता भामरे, अंबादास खैरे, गौरव गोवर्धने, संजय खैरणार, किशोर शिरसाठ, शंकर मोकळ, मनोहर कोरडे, मुजाहिद शेख, जीवन रायते, मकरंद सोमवंशी, महेश भामरे आदी उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली मते मांडली. यावेळी आगामी नाशिक महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केली.