छगन भुजबळ यांची भाजप प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 15:52 IST2019-12-09T15:50:06+5:302019-12-09T15:52:50+5:30
नाशिक- राज्यातील सत्तांतरानंतर भाजपतील अनेक पर पक्षातील नेते परतीच्या मार्गावर असल्याची चर्चा असतानाच आज नाशिकमध्ये राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी भेट घेतली. त्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला.

छगन भुजबळ यांची भाजप प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी घेतली भेट
नाशिक- राज्यातील सत्तांतरानंतर भाजपतील अनेक पर पक्षातील नेते परतीच्या मार्गावर असल्याची चर्चा असतानाच आज नाशिकमध्ये राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी भेट घेतली. त्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला.
वसंत गिते हे शिवसेनेत असल्यापासून त्यांचे आणि छगन भुजबळ यांचे संबंध आहेत. गिते यांनी शिवसेनेनंतर मनसेत प्रवेश करून राज ठाकरे यांना साथ दिली. प्रदेश सरचिटणीसपदावर काम करताना ते मनसेचे आमदारही झाले. त्यानंतर महापालिकेत मनसेची सत्ताही आली होती. दरम्यान, राज ठाकरे यांच्याशी बिनसल्यानंतर गिते भाजपवासी झाले. भाजपने २०१७ मध्ये झालेल्या निवडणूकीत गिते यांचे पुत्र प्रथमेश गिते यांना उमेदवारी तर दिलीच शिवाय अनेक ज्येष्ठांना डावलून त्यांना उपमहापौरपद देखील दिले. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणूकीत वसंत गिते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी मिळाली नाही. या मतदार संघात विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांनाच पक्षाने संधी दिली. तेव्हापासून गिते नाराज असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी नाशिक येथे भुजबळ यांच्या निवासस्थानी छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिले. ही केवळ सदिच्छा भेट होती. भुजबळ यांच्याशी आपले पक्ष विरहीत नाते असून ज्येष्ठत्वाच्या नात्यावर त्यांनाच पालकमंत्रीपद मिळावे अशी इच्छा गिते यांनी व्यक्त केली.