नाशिक पोलिसांपुढे १५२ वाहनांचे मालक शोधण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 14:40 IST2018-03-15T14:40:57+5:302018-03-15T14:40:57+5:30
नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील तेराही पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून बेवारस वाहने पडून आहेत. त्यात प्रामुख्याने अपघातात नुकसान झालेले वाहने, रस्त्यावर बेवारस पडलेले व चोरांनी सोडून दिलेल्या वाहनांचा समावेश आहे. या वाहनांवर क्रमांकही आहेत,

नाशिक पोलिसांपुढे १५२ वाहनांचे मालक शोधण्याचे आव्हान
नाशिक : विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले तसेच चोरीच्या बेवारस पडून असलेल्या सुमारे १५२ दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनांचे मालक शोधण्याचे आव्हान शहर पोलिसांपुढे उभे ठाकले असून, या संदर्भात वाहनांच्या अज्ञात मालकांना वेळोवेळी आवाहन करूनही या वाहनांची ओळख पटत नसल्याने अखेर त्यांचा जाहीर लिलाव करून सदरची रक्कम शासन जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील तेराही पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून बेवारस वाहने पडून आहेत. त्यात प्रामुख्याने अपघातात नुकसान झालेले वाहने, रस्त्यावर बेवारस पडलेले व चोरांनी सोडून दिलेल्या वाहनांचा समावेश आहे. या वाहनांवर क्रमांकही आहेत, परंतु त्याचा आधार घेवून पोलिसांनी तपास केला असता, त्यावरील क्रमांक बनावट असल्याने बहुतांशाी वाहने चोरीची असल्याचा संशय पोलिसांना आहे. विशेष करून दुचाकी वाहनांचा यात समावेश आहे. पोलिसांनी बेवारस वाहने उचलून पोलिस ठाण्याच्या आवारात उभ्या केल्या आहेत. अनेक वर्षापासून पडून असलेल्या या वाहनांची अवस्था अतिशय बिकट असली तरी, त्याची कायदेशीर विल्हेवाट लावण्यापुर्वी वाहनांच्या मालकांचा शोध घेणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाने वेळोवेळी वाहनांच्या क्रमांकासह यादी जाहीर करून मालकांनी त्याची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. आता पुन्हा पोलीस आयुक्तालयाने या वाहनांची यादी जाहीर केली असून त्यात १२३ दुचाकी, २६ तीन चाकी म्हणजे रिक्षा व ३ चारचाकी ३ वाहनांचा समावेश आहे. येत्या दहा दिवसात वाहनांच्या मालकांनी कागदपत्रांसह अोळख पटवून वाहने घेवून जावेत अन्यथा या वाहनांचा जाहीर लिलाव करून त्याची रक्कम सरकार जमा करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तालयाने घेतला आहे.