शहरात २६५ ठिकाणी लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

By Admin | Updated: September 10, 2016 01:21 IST2016-09-10T01:20:44+5:302016-09-10T01:21:16+5:30

प्रकल्प समिती बैठक : महापालिकाही देणार निधी

CCTV cameras in 265 locations in the city | शहरात २६५ ठिकाणी लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

शहरात २६५ ठिकाणी लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

नाशिक : वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्यासाठी २६५ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान, शहरातील अंतर्गत रस्ते, कॉलनी परिसर याठिकाणीही सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी महापालिकेकडून सूचना मागविण्यात आल्या असून महापालिकेने निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने कायमस्वरूपी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याकरिता सर्वेक्षण हाती घेतले असून, त्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची बैठक पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पोलीस उपआयुक्तांसह महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख, सभागृहनेत्या सुरेखा भोसले, मनसेचे गटनेते अनिल मटाले, रिपाइंचे प्रकाश लोंढे आदि उपस्थित होते. यावेळी शहरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी २६५ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून त्याठिकाणी ६९६ कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली. महापालिकेने काही प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली असता महापौरांनी त्याची तयारी दर्शविली व अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूद करण्याचे आश्वासित केले.

Web Title: CCTV cameras in 265 locations in the city