Caution from the administration at the railway station | रेल्वेस्थानकात प्रशासनाकडून खबरदारी

मनमाड रेल्वेस्थानकावत प्रवाशांची सुरू असलेली तपासणी.

ठळक मुद्देप्रवाशांची तपासणी : पालिकेकडूनही पथके तैनात

मनमाड : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख असलेल्या मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकात आरोग्य विभाग व रेल्वेच्या सहकार्याने खबरदारी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने रेल्वेमार्गाने परप्रांतातून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ तपासणी केली जात आहे.

उत्तर महाराष्ट्रात मनमाड स्थानक हे मोठे जंक्शन असून, प्रसिद्ध गुरुद्वारामुळे सध्या सुरू असलेल्या विशेष रेल्वेगाड्यांमधून परप्रांतातील अनेक प्रवासी मनमाड येथे येत आहेत. त्याअनुषंगाने मनमाड स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची खात्री करून घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पालिका प्रशासन व आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने यासाठी सहा कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आहे. सध्या मनमाड स्थानक प्रवेशद्वाराजवळ रेल्वे प्रशासनातर्फे तपासणी करून प्रवाशांचे आरक्षित तिकीट पाहून व त्याची योग्य ती नोंद करूनच त्यांना स्थानकात प्रवेश दिला जात आहे.

इन्फो

तपासणी यंत्रणा कार्यान्वित

रेल्वेमार्गाने येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश शासनाने जिल्हाधिकारी यांना दिले आहेत आहेत. त्यामुळे शासनातर्फे मनमाड स्थानकात प्रवाशांची तपासणी करण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात इतर रेल्वेस्थानकांसह महत्त्वपूर्ण अशा मनमाड व नांदगाव स्थानकात ही तपासणी होईल. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

 

Web Title: Caution from the administration at the railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.