स्पर्धा परीक्षार्थींची शिबिरासाठी झुंबड
By Admin | Updated: January 12, 2016 00:26 IST2016-01-12T00:23:35+5:302016-01-12T00:26:09+5:30
स्पर्धा परीक्षार्थींची शिबिरासाठी झुंबड

स्पर्धा परीक्षार्थींची शिबिरासाठी झुंबड
नाशिक : स्पर्धा परीक्षा देऊ पाहणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी मार्गदर्शन व अभ्यासाच्या कला अवगत करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने पहिल्यांदाच मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिराला विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांकरवी स्पर्धा परीक्षा देऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही या परीक्षांबाबत तसेच अभ्यासाबाबत मार्गदर्शन करून त्यांचा या क्षेत्रात अधिकाधिक सहभाग वाढावा, हा त्यामागचा हेतू आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी याकामी पुढाकार घेतला. त्यासाठी सोमवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे शिबिराची माहिती देण्यासाठी विद्यार्थ्यांना हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
सभागृहात बसण्यासाठी जागा नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी व्यासपीठाच्या खाली जमिनीवरच ठाण मांडले, तर खुर्च्यांच्या रांगेतही मिळेल त्याठिकाणी हजेरी लावली. स्पर्धा परीक्षांची बदललेली पद्धती, अभ्यासाचे तंत्र याची तोंडओळख करून देतानाच जिल्हाधिकारी कुशवाह यांनी यापुढे दर महिन्यात एकदा अशा प्रकारे शिबिराचे आयोजन करून स्पर्धा परीक्षांमध्ये अव्वल आलेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शनासाठी पाचारण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी प्रशिक्षणार्थी आयएएस विजयालक्ष्मी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची तुडुंब गर्दी पाहता येणाऱ्या काळात प्रशस्त जागेत शिबिर घेण्याचेही ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)