क्लासमधील बाकावर बसण्याचा वाद जीवावर बेतला; बेदम मारहाणीत १० वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 16:33 IST2025-08-03T16:30:35+5:302025-08-03T16:33:52+5:30
नाशकात क्षुल्लक कारणावरुन झालेल्या मारहाणीत एका १० विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

क्लासमधील बाकावर बसण्याचा वाद जीवावर बेतला; बेदम मारहाणीत १० वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
Nashik Crime: सातपूरमध्ये यशराज तुकाराम गांगुर्डे या दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाचा खासगी क्लासजवळ शनिवारी सायंकाळी रस्त्यात कोसळून मृत्यू झाला होता. विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत चर्चाना पेव फुटले होते. मात्र आता यशराजच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. क्लासमध्ये बाकड्यावर बसण्याचा किरकोळ वादातून अल्पवयीन मुलाची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांना दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
अशोकनगर येथील पवार संकुलातील गांगुर्डे कुटुंबीयांचा मुलगा यशराज हा मॉर्डन विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. शनिवारी तो क्लासला येण्यासाठी घरातून बाहेर पडला. साडेसहा वाजेच्या दरम्यान तो क्लासजवळ असलेल्या उद्यानाजवळ रस्त्यात कोसळला. ही बाब काही विद्यार्थ्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी क्लास शिक्षक व संचालकांना सांगितली. संचालक म्हस्के बंधूंनी यशराज यास जवळच्या दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी तेथून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले असता त्यांनी त्यास रुग्णालयात संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
यशराज याच्या मृत्यूबाबत विविध चर्चाना पेव फुटले होते. त्यामुळे शनिवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेमागील गूढ कायम होते. यशराजला कुठलाही आजार नव्हता. त्याचे कोणासोबत भांडण झाले नसल्याचे त्याच्या मोठ्या भावाने सांगितले. मात्र पोलीस तपासादरम्यान, खाजगी क्लासमध्ये बाकड्यावर बसण्याहून झालेल्या वादात शाळकरी मुलाची हत्या करण्यात आल्याचे समोर आलं आहे.
यशराजचे त्याच्या क्लासमध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसोबत बाकावर बसण्याहून बुधवारी वाद झाला होता. तेव्हापासून दोन्ही मुले त्याला सारखी डिवचत होती. या वादातून यशराजला शनिवारी क्लासच्या आवारात क्लासमधील दोन मुलांनी मारहाण केली. याच मारहाणीत यशराजचा मृत्यू झाल्याचे म्हटलं जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, कोरोनाकाळात यशराजच्या वडिलांचे निधन झाले होते. या धक्क्यातून गांगुर्डे कुटुंबीयांनी स्वतःला सावरले होते. त्याचा मोठा भाऊ पिठाची गिरणी चालवतो. यशराज अभ्यासातदेखील हुशार होता, असे शिक्षकांसह कुटुंबीयांनी सांगितले.