भाजपाची पहिली यादी २७ जानेवारीस

By Admin | Updated: January 20, 2017 01:20 IST2017-01-20T01:19:55+5:302017-01-20T01:20:11+5:30

मुलाखती पूर्ण : सातशे इच्छुकांच्या मुलाखती

The BJP's first list is on 27th January | भाजपाची पहिली यादी २७ जानेवारीस

भाजपाची पहिली यादी २७ जानेवारीस

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती संपल्यानंतर आता ही यादी प्रदेश कार्यालयाकडे शिफारस करण्यात येणार असून, येत्या २७ जानेवारीस पहिली यादी घोषित होणार आहे. गुरुवारी मुलाखतीचे कामकाज संपल्यानंतर प्रदेश संघटनमंत्री रवि भुसारी यांनी शिफारशीसह सर्व अहवाल ताब्यात घेतला असून, शुक्रवारी तो मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना सादर करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या १२२ प्रभागांसाठी भाजपाने तीन दिवस इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सुमारे सातशे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक १ ते १०, दुसऱ्या दिवशी प्रभाग क्रमांक ११ ते २० आणि तिसऱ्या दिवशी २१ ते ३१ क्रमांकाच्या प्रभागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. प्रदेश संघटनमंत्री किशोर काळकर, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे व डॉ. अपूर्व हिरे तसेच प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागुल यांच्यासह अन्य आघाड्यांच्या प्रमुखांनी या मुलाखती घेतल्या. यावेळी सलग तीन दिवस या मुलाखती झाल्यानंतर शिफारस केलेल्या उमेदवारांची नावे शुक्रवारी प्रदेश कार्यालयात सादर होणार आहेत. ज्या उमेदवारांची नावे सर्व सहमतीने ठरली आहेत, अशा निर्विवाद उमेदवारांची पहिली यादी २७ जानेवारी रोजी घोषित करण्यात येणार आहेत. किमान ५० टक्के उमेदवारांचा यात समावेश असेल, त्यानंतर उर्वरित उमेदवारांचा समावेश असणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींमुळे सध्या उमेदवारी कुणाला मिळते याकडे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The BJP's first list is on 27th January