"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 20:45 IST2025-11-05T20:43:35+5:302025-11-05T20:45:55+5:30
माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा आरोप केला असून, संबंधित गिरीश महाजन यांचा समर्थक असल्याचेही ते म्हणाले.

"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
Nashik Crime: नाशिकमध्ये सध्या पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू केले आहे. त्यात सर्वच राजकीय पक्षांना झटका बसला आहे. मात्र, उद्धवसेनेचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नाशिकच्या एका भाजप आमदाराला मारण्याची सुपारी नाशिकच्याच एका माजी नगरसेवकाने दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. विशेष म्हणजे संबंधित नगरसेवक हा पक्षाचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा समर्थक असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे.
गिरीश महाजन यांनी मात्र या आरोपाचा इन्कार केला आहे. नाशिकमध्ये गुन्हेगारी टोळ्यांना पोलिस चांगलाच दणका देत असले तरी भाजप आमदाराच्या कथित सुपारीची अधिकृत माहिती अद्याप कोणतीही माहिती बाहेर आलेली नाही.
दुसरीकडे दानवे यांनी हा सर्व प्रकार मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना माहिती असून संबंधित नगरसेवक देखील गिरीश महाजन समर्थक असल्याचा दावा केला आहे. नांदेडमध्ये माध्यमांशी बोलतानाचा दानवे यांनी हा आरोप केला आहे. त्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे संबंधित आमदार कोण आणि नगरसेवक कोण यांची नावे आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे गृहमंत्री त्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्नही केला आहे.
नाशिकमध्ये राजकीय गुन्हेगारी वाढल्याने सरकारवर टीका होत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आयुक्तांचे हात मोकळे सोडल्याने त्यांनी भाजपापासूनच दणका देण्यास सुरुवात केली आहे.
सध्या भाजपाचे दोन माजी नगरसेवक देखील तुरुंगात आहेत. त्यात नव्या आरोपाने खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये अनेक सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यात कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेऊन पोलिस कारवाई करीत आहेत. त्यात हा प्रकार आढळला का? याची चर्चा आहे.
शहरात ठरला चर्चेचा विषय
अंबादास दानवे यांचा आरोप खरा असेल तर गंभीर असल्याचे भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दानवे यांच्या विधानामुळे तो माजी नगरसेवक कोण? तसेच आमदार कोण? हा शहरभरात चर्चेचा विषय ठरला आहे.