नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 08:31 IST2025-12-18T08:30:54+5:302025-12-18T08:31:46+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही महायुती हवी आहे त्यामुळे ते सातत्याने भाजपा नेतृत्वाशी चर्चा करत आहेत. व्यवहार्य तोडगा काढण्याच्या मानसिकतेत दोन्ही पक्षांचे नेतृत्व आहे

नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
नाशिक - आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेनेचे स्थानिक नेते स्वबळाची भाषा करत असले तरी प्रत्यक्षात वरिष्ठ पातळीवरून महायुती म्हणून निवडणुकांना सामोरे जाण्याची रणनीती आखण्यात आली आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे युतीसाठी आग्रही आहेत. त्यातच महापालिकेच्या १२२ जागांपैकी किमान निम्म्या म्हणजे ६० जागांची मागणी शिंदेसेनेने केली आहे परंतु अंतिम वाटाघाटीत शिंदेसेनेला ३५ ते ३८ जागांवर राजी करायचे आणि साधारण ८५ जागा भाजपाने लढवायच्या असा भाजपा नेत्यांचा प्रयत्न आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर जनमत तीव्र बनले आहे. त्यात शहरातील इतर नागरी समस्या आणि सत्ताधाऱ्यांकडून नाशिकला डावलले जात असल्याची भावनाही जनमानसात आहेत. त्यातच मनसे आणि उद्धवसेना एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या दोन्ही पक्षांचे आजही बऱ्यापैकी संघट असून नाशिकरोड, सातपूरसारख्या भागात त्यांचे तगडे आव्हान महायुतीसमोर असेल. त्याशिवाय ऐनवेळी सत्ताधारी पक्षातून तिकीट न मिळाल्याने नाराजांची रसदही उद्धवसेना-मनसेचे बळ वाढवू शकते या स्थितीत भाजपा आणि शिंदेसेना वेगळे लढल्यास महायुतीत मतांचे विभाजन होईल त्यामुळे भाजपाच्या राज्यस्तरीय नेतृत्वाला शिंदेसेनेसोबत सकारात्मक बोलणी करण्याची इच्छा आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही महायुती हवी आहे त्यामुळे ते सातत्याने भाजपा नेतृत्वाशी चर्चा करत आहेत. व्यवहार्य तोडगा काढण्याच्या मानसिकतेत दोन्ही पक्षांचे नेतृत्व आहे. गेल्यावेळी भाजपाचे ६६ नगरसेवक निवडून आले होते. भाजपा आणि शिंदेसेना वेगवेगळे लढल्यास बहुसंख्य ठिकाणी याच दोन पक्षांमध्ये प्रमुख लढत होईल. मतविभाजनाचा तोटा होईल. त्याचा लाभ उद्धवसेना-मनसे तसेच बंडखोरांना होईल, हे उघड आहे. त्याउलट युती म्हणून एकत्रित निवडणूक लढविल्यास मतविभाजन टळण्याबरोबच जिंकण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढून समोरचे आव्हानही कमकुवत होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, अन्य पक्षांतून आलेल्यांची संख्या पाहता भाजपाकडे ७५ जणांची ठाम दावेदारी आहे. तर शिवसेना फुटल्यानंतर शिंदेसेनेकडे गेलेले नगरसेवक आणि अन्य पक्षांतून फुटून आलेल्यांची संख्या ३२ पर्यंत जाते. उर्वरित १५ पैकी साधारण १० जागा भाजपाच्या तर ५ जागा शिंदेसेनेच्या वाट्याला आल्यास दोन्ही पक्षांतील प्रबळ दावेदारांना सामावून घेत तिकीट वाटप शक्य आहे. दोन्ही पक्षांचे नेतृत्व या फॉर्म्युल्यासाठी सकारात्मक असून आठवडाभरात तसा निर्णय होईल असे सांगण्यात येत आहे.